Avinash Jadhav | FB

मीरा भाईंदर मध्ये काही दिवसांपूर्वी अमराठी व्यापार्‍याला मारहाण झाल्यानंतर त्यांच्याकडून शक्तीप्रदर्शन करत बंद पाळण्यात आला होता. आता त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसे ने आज मोर्चा आयोजित केला आहे. पण पोलिसांनी परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पदाधिकार्‍यांना नोटीसा बजावल्या आहेत. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पहाटे 3.30 च्या सुमारास मोठ्या फौजफाट्यासह पोलिस अविनाश जाधवांच्या घरी पोहचले आणि त्यांना ताब्यात घेतले. सध्या पोलिसांनी त्यांना काशिमिरा पोलिस ठाण्यात ठेवले आहे. दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि राजू पाटील यांनाही या परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पोलिसांनी वसई आणि विरारमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये आज मोर्चा होणार का? याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. हा मोर्चा आज सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेलपासून सुरू होणार असून, मिरा रोड स्टेशन परिसरापर्यंत आयोजित करण्यात आला आहे. नक्की वाचा: Raj-Uddhav Thackeray Reunion: 'आवाज मराठीचा' च्या कार्यक्रमादरम्यान राज-उद्धव ठाकरे आले एकत्र; सोशल मीडीयात 'बाळा नांदगावकर' यांनी केलेल्या कृतीची क्लिप वायरल ( Watch Viral Video).  

जोधपूर स्वीट्स अँड फरसाणचे मालक बाबूलाल चौधरी यांना मराठी भाषेचा अपमान केल्याच्या आरोपावरून काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नसल्याचं  म्हटलं आहे.