मनसे पक्षाचा नवा झेंडा कसा असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. येत्या 23 जानेवारीला मुंबईत होणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण होणार आहे. त्याची संकेत मिळण्यास हळू हळू सुरुवात झाली असून 20 जानेवारीला मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन मनसेचा झेंडा ही हटविण्यात आला असून केवळ इंजिन ठेवण्यात आले आहे. आज मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात हिंदवी स्वराज्याची झलक पाहायला मिळत आहे.
येत्या गुरुवारी होणा-या मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनासाठी विशेष तयारी सुरु झाली आहे. याच दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती देखील आहे. याच दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या पक्षाची पुढील भूमिका तसेच नवीन धोरणं काय असणार हे स्पष्ट करणार आहेत. त्याआधी मनसेने आपल्या ट्विटर अकाउंट एक व्हिडिओ शेअर केला आहे.
MNS Adhikrut ट्विट:
#मनसे_अधिवेशन #राजठाकरे #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रसैनिक #RajThackeray #MaharashtraDharma #HindaviSwarajya pic.twitter.com/6VzHDgY5hM
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 21, 2020
हेदेखील वाचा- मनसेचे पक्ष चिन्ह बदलले? राज ठाकरेंनी हटवला झेंडा, उरले फक्त इंजिन
या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आकृती दिसत आहे. तसेच या ट्विटमध्ये ‘हिंदवी स्वराज्य’ हा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे. 16 सेकंदाच्या या व्हिडिओला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आवाज देण्यात आला आहे. राज यांच्या भाषणातील “महाराजांच्या आजपर्यंतच्या सगळ्या लढाया आपण पाहिल्या तर प्रत्येक लढाईमध्ये प्रत्येक जातीचा माणूस हिंदवी स्वराज्यासाठी लढत होता” ही ओळही व्हिडिओत ऐकू येते.
काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेच्या मतदारांना या मुद्द्याच्या आधारावर आकर्षित करण्याचा मनसेचा विचार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.
मनसेच्या पूर्वीच्या झेंड्यात निळा, भगवा, पांढरा आणि हिरवा असे रंग होते. यामध्ये पक्षाचे चिन्ह असलेले इंजिन आहे. आता नव्या हे चारही रंग गेल्याचे दिसत आहे. सध्या फक्त इंजिन असलेले दिसून येत आहे मात्र झेंड्याचे रंग जाऊन त्याठिकाणी भगवा रंग येणार असल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता मनसेचा नवा झेंडा होणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.