ठाणे आंबा वाद: मनसेकडून उद्या ठाण्यात शेतकरी मोर्चा, पहा नक्की काय आहे प्रकरण आणि मागण्या
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो सौजन्य-फेसबुक)

ठाणे (Thane) येथे मनसे (MNS) आणि भाजप (BJP) मध्ये आंबे विक्रीवरून उफाळलेला वाद अजूनही चालूच आहे. आता या वादानंतर मनसेकडून राज्यातील शेतकऱ्यांचा विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. उद्या, 17 मे रोजी राज्यातील विविध भागातून शेतकरी आपल्या मागण्यांसाठी ठाण्यात जमणार आहेत. या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) स्वत: उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.

शेतकरी ते थेट ग्राहक या अंतर्गत नौपाडा, ठाणे येथे मनसे तर्फे लावण्यात आलेला आंब्याचा स्टॉल, भाजप कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून हटवण्यात आला होता. मात्र त्याच जागेवर परप्रांतीयांचे स्टॉल तसेच चालू होते. यावरून मनसे आणि भाजप कार्यकर्ते यांच्यामध्ये चांगलीच जुंपली होती. याबाबत सरकारला दोषी ठरवत घोषणाबाजी करण्यात आली होती. शेवटी पोलिसांना हे भांडण थांबवावे लागले होते. या वादानंतर मनसेने सरकारवर निशाणा साधत शेतकरी मोर्चा काढायचा निर्णय घेतला. उद्या निघणाऱ्या या मोर्चात ठाण्यातील शेतकरी, आंबा विक्रेते आणि मनसे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

मोर्चातील शेतकऱ्यांच्या मागण्या –

आठ ते दहा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी 100  स्टॉल उपलब्ध करावेत.

सचिन मोरे या शेतकऱ्याकडून पैसे मागणाऱ्या भाजपा नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा.

दरम्यान, या मोर्चासाठी नाशिक, पुणे, मराठवाडा, कोकण अशा महाराष्ट्रातील विविध प्रांतातून शेतकरी येणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही या मोर्चाला पाठींबा दर्शवला आहे, त्यामुळे हा मोर्चा अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.