मुंबई महापालिका निवडणूक 2022 (BMC Elections 2022 ) बाबात पहिल्यांदा भाजप (BJP) आणि त्यानंतर शिवसेना (Shiv Sena) या दोन्ही पक्षांनी रणशिंग फुंकले. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि राष्ट्रीय काँग्रेस या दोन्ही पक्षांनीही आपापल्या पद्धतीने तयारी सुरु केली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sen) पक्ष मात्र यात कोठेच नव्हता. परंतू, आता मनसेनेही आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कंबर कसली आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितत वांद्रे येथील MIG क्लबमध्ये मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांची आज (12 जानेवारी 2020) एक महत्त्वाची बैठक पार पडली.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची असलेल्या या बैठकीस स्वत: राज ठाकरे, त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासह पक्षाचे सर्व सरचिटणीस, प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज ठाकरे यांनी आगादी निवडणुकांबाबत काही सूचना केल्या. तसेच, निवडणुकांसाठी एक समिती नेमण्याचेही आदेश दिले. अत्यंत मर्यादीत वेळेत झालेल्या बैठकीत फारसे मुद्दे चर्चेला आले नसल्याचे समजते. आगामी रणनितीबाबत राज ठाकरे यांचे निवास्थान कृष्णकुंजवर लवकरच एक बैठक घेण्यात येणार असल्याचे समजते.
आजच्या बैठकीत राज ठाकरे काय मार्गदर्शन करतात, निर्णय घेतात याकडे महाराष्ट्रातील तळागाळातील मनसे कार्यकर्त्यांचेही लक्ष लागून राहिले होते. राज्यातील विविध राजकीय पक्ष आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन रणनिती आखत असताना मनसे त्या चर्चेत कुठेच नव्हती. त्यामुळे मनसेची नेमकी रणनिती आहे तरी काय? याबाबत उत्सुकता होती. (हेही वाचा, Maha Govt Reduces Security of Raj Thackeray: राज ठाकरे यांची सुरक्षा काढून घेणे हे सरकारचे घाणेरडे राजकारण आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया)
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या गोटातही पडद्यापाठिमागे बऱ्याच हालचाली सुरु असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंज येथे बैठकांचे सत्र प्रदीर्घ काळापासून सुरु आहे. या बैठकीत पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांकडून जिल्हावार माहिती घेत आहेत. यात स्थानिक पातळीवरिल माहितीला प्राधान्य दिले जात असल्याचे बोलले जात आहे. याच वेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्याचे समजते. त्यामुळे आजच्या बैठकीत मोठा निर्णय काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.