Sandeep Deshpande | (Photo Credit : Facebook)

4 मे दिवशी मनसेच्या भोंगा आंदोलनादरम्यान शिवाजी पार्क परिसरात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), नेते संतोष धुरी (Santosh Dhuri) पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले होते. तेव्हापासून अज्ञातवासात असलेल्या या दोघांनाही आज दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यासोबतच मनसेचे संतोष साळी आणि संदीप देशपांडे यांचे चालक रोहित वैश्य यांनाही जामीन मंजूर केला आहे.

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आमच्या संयमाचा अंत पाहू नका. सत्ता येते जाते. असा स्पष्ट इशारा दिला होता. याच पत्रामध्ये त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांविरूद्ध होणारी पोलिसांची दडपशाहीची वागणूक यावरही टीका केली होती. आज अखेर मनसेच्या नेत्यांना 15 दिवसांनंतर दिलासा मिळाला आहे.

राज ठाकरेंच्या निवासस्थाना बाहेर मीडीयाशी बोलल्यानंतर संदीप देशपांडेंना ताब्यात घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला होता पण ते पळून गेले. यावेळी झालेल्या गोंधळामध्ये एक महिला पोलिस कर्मचारी पडल्या आणि प्रकरण चिघळलं. पोलिसांनी संदीप देशपांडे विरूद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचं सांगत गुन्हा दाखल केला. यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी फरार झाले होते.

संदीप देशपांडे गायब असले तरीही त्यांनी एक व्हिडिओ जारी करत आपला महिला पोलिस कर्मचार्‍याला किंवा त्यांच्या गाडीचा तिला धक्का लागला नसल्याचं म्हटलं आहे.