मनसे नेते Sandeep Deshpande यांच्या अडचणींमध्ये वाढ? गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी 'या' कारणावरून दिले देशपांडेंविरूद्ध तात्काळ कारवाईचे निर्देश
Sandeep Deshpande | (Photo Credit : Facebook)

महाराष्ट्रामध्ये आज मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली आहेत. दरम्यान काही भागात मौलवींनी सामंजस्याची भूमिका घेत भोंग्यांशिवायच अजान दिली तर काही ठिकाणी हनुमान चालिसा विरूद्ध अजान असा संघर्ष दिसला. मुंबईतही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून काही प्रमुख नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. अशाच एका कारवाई मध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना ताब्यात घेताना शिवाजी पार्क परिसरामध्ये धक्काबुक्की झाली आणि एक महिला पोलिस अधिकारी पडली. पोलिसांनी, राज्य सरकारने या प्रकाराची दखल घेतली आहे.

मुंबई मध्ये पोलिसांच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी त्यांच्या हातावर तुरी देत पळून जाण्याचा हा प्रकार संदीप देशपांडे यांच्यासाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. संदीप देशपांडे यांनी सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याच्या प्रकारावरून आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी देखील ट्वीट करत याची माहिती दिली आहे. देसाई यांनी 'मनसेचे नेते श्री. संदिप देशपांडे यांनी आज मुंबई पोलीस दलातील महिला अधिकारी यांचेशी केलेल्या गैरवर्तनाबद्दलची माहिती मी घेतली असून सदरच्या घडलेल्या गंभीर प्रकाराबद्दल तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त श्री. संजय पांडे यांना दिले आहेत.' असे स्पष्ट केले आहे. नक्की वाचा:  Loudspeaker Row In Maharashtra: लाऊडस्पीकर वर हनुमान चालिसा लावण्याच्या आरोपाखाली 250 पेक्षा जास्त मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात.

शंभूराजे देसाई यांचं ट्वीट

पोलिसांकडून सध्या सीसीटीव्ही फूटेज, मीडीया फूटेज तपासून पाहिले जात आहे. त्यामधील पुराव्यांच्या आधारे संदीप देशपांडे यांच्यावर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

संदीप देशपांडे यांच्यासोबत संतोष धुरी देखील होते. दोघेही मीडीया बोलून पुढे जात गाडीमध्ये बसून पोलिसांना हुलकावणी देण्याच्या घाईगडबडीमध्ये हा सारा प्रकार घडला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, हा प्रकार पाहून राज ठाकरेंनी त्या महिला पोलिस कर्मचार्‍याला भेटीचं आमंत्रण दिलं आहे.