MNS leader Sandeep Deshpande, CM Uddhav Thackeray (PC- facebook and PTI)

राज्यात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंदिरं (Temples) बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, राज्यातील अनलॉकनंतर मॉल्स, हॉटेल्स सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाकडून मंदिर उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातचं आता राज्यात मंदिर सुरू करण्यासाठी मनसेनेदेखील (MNS) आक्रमक भूमिका घेतली आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ठाकरे सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘पहले मंदिर फिर सरकार!’ ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक म्हणणारे लोकांना मुख्यमंत्री झाल्यावर मंदिरात जाऊ देत नाहीत ह्याला निर्णय शैथिल्य म्हणायचे की तथागतीत पुरोगामीत्व सिद्ध करण्याची चढाओढ? असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. (हेही वाचा - बदल्या तर होणारच! कर्तबगारी, राज्याची गरज पाहून अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या; सामना अग्रलेखातून विरोधकांचा समाचार)

दरम्यान, गुरूवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील मंदिर उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी ' राज्यातील मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती 100 करण्याची परवानगी दिली जात आहे. मग सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?' असा प्रश्न राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केला होता.