Ganeshotsav 2020 MNS Bus Service: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मनसेने आजपासून सुरू केली विशेष बस सेवा
Ganeshotsav 2020 MNS Bus Service (PC - Facebook)

Ganeshotsav 2020 MNS Bus Service: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मनसेने (MNS) आजपासून विशेष बस सेवा (Bus Service) सुरू केली आहे. यापूर्वी मनसेने महाविकास आघाडी सरकार कोकणातील गणेशभक्तांना गावाकडे जाण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध करून देत नसल्याचं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर मनसेने आजपासून बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेच्या या उपक्रमामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गणेशोत्वासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होऊ नये, यासाठी काही दिवसांपूर्वी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मनसेच्या वतीने कोकणात जाण्यासाठी बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यावेळी बुकिंगची तारीखदेखील जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार, 1 ऑगस्टपासून बुकिंग सुरू करण्यात आलं होतं. त्यामुळे आजपासून कोकणात बस सोडण्यात आल्या आहेत. (हेही वाचा - Ganeshotsav E-Pass: गणेशोत्सवासाठी खासगी वाहनांना लागणारे ई-पास आता सहज उपलब्ध होणार; असा करा अर्ज)

दरम्यान, मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी सांगितलं की, गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना कोकणात सोडण्याची जबाबदारी राज्य सरकारची होती. मात्र, ही जबाबदारी सरकारने योग्य पद्धतीने पार पाडलेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभम्र आणि नाराजी पसरली होती. म्हणून मनसेने पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवला आहे. आजपासून मुंबईतील विविध भागांतून कोकणात जाण्यासाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना गावी सोडण्यासाठी दादरहून 10 ते 15 बसेस सोडण्यात आल्या आहेत. तसेच काही बसेस ठाणे, भांडूप आणि इतर भागातून सोडण्यात येणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून या प्रवाशांना घरी सोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मनसेने या प्रवासासाठी पॅसेंजर सेफ्टी कीट बनवले आहेत. यामध्ये फेस मास्क, हँड ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर, बेडशीट यांचा समावेश असल्याचंही सरदेसाई यांनी सांगितलं आहे.