Narendra Patil enters NCP (Photo Credits: Twitter)

Narendra Patil Enters NCP: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज पहिले राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. अनेक मोठे निर्णय या अधिवेशनादरम्यान (MNS Maha Adhivesh) जाहीर करण्यात येणार आहेत. परंतु, आजच्याच दिवशी मनसेला एक मोठा धक्का बसला आहे. धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी आज मनसेला राम राम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी आज मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयासमोर आत्महत्या केली होती. नरेंद्र पाटील हे त्यांचेच पुत्र आहेत.

नरेंद्र पाटील मूळचे धुळे जिल्ह्यातील विखरण गावचे रहिवासी आहेत. आणि त्यांचे वडील धर्मा पाटील यांनी 22 जानेवारी 2018 रोजी मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु,  उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

त्यानंतर नरेंद्र पाटील यांनी आपल्या आईला सोबत घेऊन सरकारविरोधात आवाज उठवला होता. नंतर त्यांनीही त्यांच्या गावातील एका मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.

मनसे महाअधिवेशनात शॅडो कॅबिनेट जाहीर होण्याची शक्यता; जाणून घ्या नक्की काय असते शॅडो कॅबिनेट...

अखेर त्यांनी मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. राज ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची तिकीट देखील दिले. परंतु, त्यांचा पराभव झाला आणि आता फक्त चार महिन्यांच्या काळातच त्यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

मनसे याकडे कसे बघते हे अजून कळलेलं नाही. परंतु, मनसेचे अधिवेशन पक्षासाठी फायदेशीर ठरणार की नुकसानीचे ते येणारा काळच ठरवेल.