
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज राज्यव्यापी महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला पक्षातील अनेक बडे नेते व राज्यभरातून आलेले कार्यकर्ते उपस्थित आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शॅडो कॅबिनेट ही संकल्पना सुरु करणार असल्याची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. याची घोषणा आज आयोजित केलेल्या मनसेच्या महाअधिवेशनात लवकरच होईल असे बोलले जात आहे. त्यामुळे अमेरिका आणि इंग्लंड यांच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रात देखील आता शॅडो कॅबिनेट ही संकल्पना पाहायला मिळणार आहे. परंतु शॅडो कॅबिनेट म्हणजे नक्की काय हे आज आपण जाणून घेणार आहोत.
शॅडो कॅबिनेट म्हणजे काय?
सत्तेत नसलेला पक्ष आपल्या नेत्यांचा एक गट तयार करून त्यांना विशेष अधिकार दिले जातात. या गटाला सरकारमधील मंत्रिमंडळात असणाऱ्या मंत्र्यांवर व त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याचे अधिकार दिले जातात. अशा या गटाला शॅडो कॅबिनेट म्हटले जाते.
मनसेच्या महाअधिवेशनात दुपारच्या सत्रात शॅडो कॅबिनेटची घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासंदर्भात मनसे नेते शिरीष सावंत यांनी ‘टीव्ही9 मराठी’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे.
संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, अविनाश अभ्यंकर, शालिनी ठाकरे, जयप्रकाश बाविस्कर या बड्या नेत्यांचा मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये समावेश असू शकतो. परंतु, कोणत्या नेत्याकडे कोण्या मंत्र्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली जाणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, आजच्या अधिवेशनात पक्षामध्ये अनेक मोठे बदल केले जाणार आहेत. काही काळापूर्वी राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नव्या झेंड्याचे देखील अनावरण केले आहे. आता ते पक्षाची विचारसरणी देखील बदलणार का हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल.