Raj Thackeray | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून येत्या 9 फेब्रुवारीला CAA च्या समर्थनार्थन आझाद मैदानावर मोठा मोर्चा काढणार असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 23 जानेवारीला झालेल्या राज्यव्यापी अधिवेशनात जाहीर केले होते. मात्र आता राज ठाकरे यांनी या वक्तव्यावर घुमजाव करत आपण सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन केलं नसल्याचं खळबळजनक वक्तव्य केले आहे.आपल्या वक्तव्याच्या प्रसारमाध्यमांकडून चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. माझं सीएएला समर्थन नसून बेकायदा पाकिस्तानी, बांगलादेशी मुसलमानांना हाकला असं म्हणालो होतो. पण याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी पदाधिका-यांची बैठक बोलावण्यात आली होती. CAA आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) पाठिंबा देण्यासंबंधी मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये मतांतर असून नेमकी भूमिका स्पष्ट करण्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 'मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका तो मान फक्त बाळासाहेबांचा', अशा शब्दांत राज ठाकरेंनी दिली मनसैनिकांना ताकीद

मनसेने 23 जानेवारीला मुंबईत राज्यव्यापी महाअधिवेशन घेतले होते. त्यांनी त्यांनी त्यांच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशातून लाखो मुसलमानांनी भारतात घुसखोरी केली असून, त्यांना हाकलून देण्याची गरज आहे असे सांगत NRC ला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शविला होता.

या अधिवेशनात भारत ही धर्मशाळा नाही. त्यामुळे येथे पाकिस्तान आणि बांगलादेशातून येणाऱ्या मुसलमानांना हाकलूनच दिले पाहिजे. सध्या जे काही लोक मोर्चे काढत आहेत त्यांना मोर्चा काढूनच उत्तर दिले जाईल, असे म्हणाले होते.