मनसे पदाधिका-यांची आज रंगशारदा मध्ये विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पदाधिका-यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष उपस्थिती लावली होती. मात्र तब्येत अस्वास्थ्यामुळे ते केवळ 10 मिनिटेच या बैठकीत उपस्थित राहू शकले. यावेळी राज ठाकरेंनी 'मला हिंदुहृदयसम्राट बोलू नका, तो मान केवळ बाळासाहेबांचाच आहे', अशी पदाधिका-यांना सक्त ताकीद दिली. तसेच CAA च्या समर्थनार्थ मनसेकडून येत्या 9 फेब्रुवारीला होणा-या मोर्चाबद्दल मार्गदर्शन केले.
मुंबईतील रंगशारदा मध्ये झालेल्या या बैठकीत राज ठाकरे यांनी येत्या 9 फेब्रुवारीला होणारा मोर्चा भव्य होईल, या उद्देशाने तयारीला लागण्याच्या सूचना राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय, मोर्चात काही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी देखील घ्यायला सांगितली आहे. मनसेच्या नव्या झेंड्याचा अर्थात शिवरायांची राजमुद्रा असलेल्या झेंड्याचा अनादर होणार नाही याची दक्षता घेण्याचेही आदेश राज यांनी दिले आहेत.
तसेच मोर्चासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली असून त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या बैठकीत सांगितले.
त्याचबरोबर सध्या मनसेच्या 'शॅडो कॅबिनेट' ची जोरदार चर्चा सुरु आहे. या बैठकीत शॅडो कॅबिनेटसंदर्भात निर्णय घेण्यात आला की नाही याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र राज ठाकरे अचानक रंगशारदामधून बाहेर पडल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.