मनसे पक्षाचे 23 जानेवारीला मुंबईत झालेल्या राज्यव्यापी अधिवेशनानंतर आज मनसे पदाधिका-यांची विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देखील उपस्थित राहणार आहे. मुंबईतील वांद्रे परिसरातील रंगशारदा सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत येत्या 9 फेब्रुवारीला मनसेने CAA समर्थनार्थ आयोजित केलेल्या मोर्च्याची रुपरेषा ठरविली जाणार असल्याची शक्यता आहे. मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनानंतर मनसैनिकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.
महाअधिवेशनातील समारोपाच्या भाषणात राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ला जाहीर पाठिंबा दिला होता. मनसे 9 फेब्रुवारीला आझाद मैदानात ‘सीएए’च्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणाही राज ठाकरे यांनी केली होती.
हेदेखील वाचा- राज ठाकरे म्हणतात 'मी मराठी आणि हिंदू सुद्धा'; मनसे येत्या 9 फेब्रुवारीस आझाद मैदानावर काढणार मोर्चा
मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये मनसेच्या नव्या झेंड्याचे राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर आपल्या पक्षाची भविष्यातील वाटचाल कशी असेल याची माहिती राज ठाकरेंना दिली.
'देशाच्या इतर भागातून लोक देशात सरळ घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिम बाहेर काढले पाहिजेत. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे', असं राज ठाकरे म्हणाले होते.
राज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलला म्हणजे त्याचा अर्थ राज ठाकरे बदलला असा होत नाही. मी तोच होतो जो पूर्वी आहे. माझी मतंही तीच आहेत जी पूर्वीपासून होती. रंग बदलून मी सरकारमध्ये जाणारा नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी राज्यव्यापी अधिवेशनात नामोल्लेख टाळत शिवसेनेला टोला लगावला होता.