Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

नाशिकच्या झाकीर हुसैन (Nashik Oxygen Tanker Leaked Incident) रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या घटनेची राज्यभरातून जितकी हळहळ व्यक्त केली जात आहे, तितकाच संताप देखील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली असून संतापही व्यक्त केला आहे. या घटनेतील दोषींवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

"ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं," असं राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.हेदेखील वाचा- Oxygen Tank Leaks at Nashik: नाशिक येथे घडलेल्या दुर्घटनेबाबत शरद पवार यांनी व्यक्त केली सहवेदना

दरम्यान या दुर्दैवी घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या घटनेच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. तसेच, या घटनेत मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार, ही दुर्घटना घडली त्या वेळी रुग्णालयात सुमारे 150 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. त्यापैकी 22 जणांचा मृत्यू झाला. आणखीही 30 ते 35 रुग्ण अत्यावस्थ असल्याची माहिती आहे. त्यामुळे मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना बुधवारी दुपारी 12.30 वाजता घडली.