Raj thackeray (Photo Credit: IANS)

मनसे पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) पालिका निवडणुकीसाठी नवनवीन फंडे वापरत आहेत. पक्षाचा अजेंडा बदलून त्यांनी त्याची सुरुवात केली खरी त्यात आणखी भर म्हणून येत्या 9 मार्चला होणारा मनसेचा वर्धापन सोहळा हा यंदा नवी मुंबईत होणार असल्याची घोषणा केली आहे. पक्षाच्या वाढीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे मनसे पक्षाचे पाऊल खूप महत्त्वाचे ठरेल अशी चर्चा रंगतेय.

या नव्या बदलाची सुरुवात मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमापासून होणार आहे. येत्या 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन आहे. यानिमित्ताने मनसेने ठाण्यात कार्यक्रम आयोजित केला आहे. तर यंदा मनसेचा वर्धापन दिनाचा सोहळाही नवी मुंबईत होणार आहे. विशेष म्हणजे फक्त मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातच नव्हे तर राज्यभरात मनसेचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. MNS New Flag: राज ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्यांचं अनावरण; 'शिवमुद्रा'चा समावेश

मिळालेल्या माहितीनुसार, पालिका निवडणुकीसाठी मनसेने नवनवीन रणनीती आखण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर मनसेनं पक्षवाढीसाठी अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार मनसे आता फक्त मुंबईपुरती मर्यादित राहिलेली नाही. तर इतर ठिकाणीही मनसेचे कार्यक्रम घेणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष वाढीसाठी आणि पक्ष बांधणीसाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी यासाठीही हा नवा प्रयत्न असल्याचे बोललं जात आहे.

23 जानेवारीला झालेल्या मनसेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनात या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले. यात भगव्या रंगाच्या मनसेच्या नव्या झेंड्यावर (MNS New Flag) छत्रपती शिवाजी महाराजांची शिवमुद्रा आहे. यामुळे मनसेचा हा नवा झेंडा मोठ्या वादात अडकण्याची शक्यता होती. या सर्व प्रकरणाविषयी बोलताना मनसेचे शिरीष सावंत यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने पाठविलेली नोटीस अद्याप आम्हांला मिळालेली नाही. राज्य निवडणुक आयोगाला आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाने पाठविलेल्या पत्राची प्रत पाठविणार आहोत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याचा विषय हा निवडणूक आयोगाच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे हा विषय जर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अख्तारित येत नसेल तर तो राज्य निवडणुक आयोगाच्या कक्षेतही येणार नाही.