Raj Thackeray, Irfan Shaikh (PC - Twitter)

Irfan Shaikh Resigned: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंगा प्रकरणी घेतलेली भूमिका पक्षासाठी महागात पडली आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे मनसे (MNS) नेत्यांचे राजीनामा सत्र सुरुचं आहे. आता मनसेचे राज्य सचिव इरफान शेख (Irfan Shaikh) यांनी राजीनामा दिला आहे. मशिदीवरील भोंग्यांना राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. भोंगे काढण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला डेडलाइन दिली आहे. मात्र, आता राज ठाकरे यांची ही भूमिका पक्षाला चांगलीचं महागात पडली आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी दर्शवत मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय शेख यांनी मनसे पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

मशिदींवरील भोंगे आणि मदरशासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यात आणि अन्य शहरांमध्ये मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र पहायला मिळाले. आता ठाणे येथील सभेतही ठाकरे हे आपल्या विधानावर ठाम राहील्याने कल्याणमधील नाराज झालेले पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी गुरूवारी मनसे प्रदेश सचिव आणि सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला. (हेही वाचा -Sanjay Raut On Mohan Bhagwat: आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा; संजय राऊत यांचा मोहन भागवत यांना खोचक टोला)

इरफान शेख यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे की, "मी पक्ष स्थापनेपासून काम करत आहे. अनेक आंदोलनात सामील होऊन अनेक गुन्हे अंगावर घेतले. 2008 च्या मराठी पाटया आंदोलनात पोलिसांनी अटक केली. अंग हिरवे निळे करेर्पयत मारहाण केली. त्यावेळी आपणचं या जखमा विसरू नको, बाकी मी बघतो असे म्हणाला होतात. आता मात्र काय बघायला मिळत आहे. समाजात कुचंबणा दुसरीकडे पक्षात अस्थिर वातावरण आहे. 16 वर्षानंतर आपल्याला अजान, मशीद, मदरसे यांच्यावर अचानक संशय आला. आम्ही तुमच्या सोबत असताना तुम्ही आम्हाला या गोष्टी बोलला असतात तर याचा सोक्षमोक्ष केला गेला असता, अस शेख यांनी राजीनामा पत्रात म्हंटले आहे."

दरम्यान, गुढीपाडव्याला घेतलेल्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावरून आक्षेप घेत हनुमान चालीसा वाजवू असे वक्तव्य केले होते. त्यानंतर देशातून विविध राजकीय व्यक्तींनी यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. या वक्तव्यानंतर आलेल्या प्रतिक्रियांना उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांनी ठाणे येथे उत्तर सभेचे आयोजन केले होते. या सभेत देखील त्यांनी भोंगे काढण्यासाठी 3 मे पर्यंत मुदत दिली आहे. शेख यांच्या राजीनाम्यामुळे मनसेचे मोठे नुकसान झाल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.