संजय राऊत, मोहन भागवत (PC - Facebook)

Sanjay Raut On Mohan Bhagwat: पुढील 15 वर्षांमध्ये अखंड भारत निर्माण होणार आहे. त्या वाटेत जो कोणी येईल तो संपला जाईल, असं विधान आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे. 'पहिल्यांदा पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या. अखंड भारताला कोणत्याही पक्षाचा विरोध नाही. हा देश पुन्हा एकदा फाळणीच्या दिशेने जात आहे', असा खोचक टोला संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना लगावला आहे.

माध्‍यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. मात्र, देशातील न्यायव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. रामनवमीच्या दिवशी विविध राज्यांमध्ये दंगली घडल्या. विक्रांत बचाव निधी प्रकरणात पैशांचा अपहार झाला आहे. त्यातील आरोपी निर्दोष नाहीत. विशिष्ट पक्षांच्या लोकांनांच अटकेपासून संरक्षण मिळते आहे. परंतु, महाविकास आघाडीच्या नेत्यांना जामीन का मिळत नाही, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. (हेही वाचा - Gunratna Sadavarte सातारा पोलिसांच्या ताब्यात; छत्रपती उदयनराजे भोसले, संभाजीराजे यांच्याविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल गुन्हा होता दाखल)

हरिद्वारमध्ये मोहन भागवत म्हणाले की, "भारत प्रगतीच्या मार्गावर सातत्याने पुढे जात आहे. जो कोणी त्याच्या मार्गात येईल, त्याचा नाश होईल. आपण अहिंसेची चर्चा करू, पण हातात काठी घेऊन ही गोष्ट बोलली जाईल. मनात द्वेष, शत्रुत्व नाही, पण जगाचा फक्त सत्तेवर विश्वास असेल तर काय करायचे?

भागवतांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, तुम्ही अखंड भारत बनवा, पण 15 वर्षे नव्हे 15 दिवसांचे वचन द्या आणि अखंड हिंदुस्थान बनवा. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न कोण पाहत नाही. हे वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही वीर सावरकरांना भारतरत्न द्या.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, "जर कोणी अखंड हिंदुस्थानबद्दल बोलत असेल, तर त्यांना आधी पीओके आणि भारताला जोडावे लागेल. त्यानंतर फाळणी झालेल्या पाकिस्तानलाही भारताशी जोडावे लागेल. श्रीलंका जोडून मग महासत्ता बनवावी लागेल. तुम्हावा कोणीही थांबवले नाही. पण त्याआधी काश्मिरी पंडितांना घरी परतायला सांगा आणि तुम्ही हे करू शकलात तर आम्ही तुम्हाला नक्कीच पाठिंबा देऊ.