NCP MLA Enters In Assembly Monsoon Session Dressed As Hemant Karkare (Photo Credits: Youtube)

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Assembly Monsoon Session) सध्या मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनात आज राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)  पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये (Prakash Gajbhiye) यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे (Hemant karkare) यांच्या गणवेशात दमदार एंट्री घेतली. यावेळी त्यांनी आपल्या हातात एक पाटी धरली होती, ज्यावर "प्रज्ञाच्या शापाने मी मरण पावलो ही अंधश्रद्धा आहे, मी देशासाठी शहिद झालो" असे ठळक अक्षरात लिहिण्यात आले होते. निवडणूक काळात साध्वी प्रज्ञा यांनी हेमेंत करकरे हे माझ्या शापामुळे मरण पावलेत असा दावा केला होता,या विधानाचा निषेध करत आज गजभिये यांनी हा पेहराव केला. पण त्यांचा हा अवतार पाहून सुरक्षा रक्षकांनी त्यांना गेटमध्ये प्रवेश घेताच अडवलं. यावेळी त्यांच्यात आणि सुरक्षा रक्षकांमध्ये काही वेळा बाचाबाची सुद्धा झाली पण मग काही वेळाने फोटोसाठी पोज देऊन ते निघून गेले.

प्रकाश गजभिये हे नेहमीच विधानसभेत आपल्या हटके शैलीमुळे चर्चेत असतात. याआधी त्यांनी एकदा शिवाजी महाराजांचा पेहराव करून एंट्री घेतली होती. त्यावेळी त्यांनी आरक्षण, शिवस्मारक, कर्जमाफीच्या पोकळ आश्वासनांशिवाय जनतेला काही मिळाले नाही अशी टीका केली होती. संभाजी भिडेंच्या आंबा खाऊन मूळ होतं विधानावरून सुद्धा त्यांनी भिडेंच्या वेशात हजेरी लावली होती.

 प्रकाश गजभिये  यांचे जुने पेहराव 

NCP MLA Prakash Gajbhiye Dressed As Sambhaji Bhide And Shivaji Maharaj (Photo Credits; File Image)

दरम्यान, मुंबईवर झालेल्या 26/11  हल्यातील शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात अनेक स्तरातून टीका झाली होती. हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने अडकवले, त्यांना मी सांगितले होते की, तुमचा सर्वनाश होईल, त्यांचा स्वत:च्या कर्मानेच मृत्यू झाला," असे धक्कादायक विधान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या या विधानामुळे भाजपा बरीच अडचणीत आली होती. पण आश्चर्य असे की यानंतर सुद्धा साध्वी प्रज्ञा यांना निवडणुकीत यश मिळाले होते. याबाबत बोलत गजभिये यांनी देशात अंधश्रद्धा नको असा सूर धरला होता.