अजित पवारांनी (Ajit Pawar) बंड करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादीत (NCP) मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याने राष्ट्रवादीतील काही आमदार द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या फूटीनंतर शरद पवारांच्या (Sharad Pawar) कारमधून प्रवास करणाऱ्या आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) यांनी आता अजित पवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. आमदार मकरंद पाटील यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह देवगिरी बंगल्यावर जाऊन अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर मकरंद पाटील यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर यावेळी अजित पवारांनी मकरंद पाटील यांना मंत्रिपद देण्याची घोषणा केली. (हेही वाचा - Sharad Pawar Nashik Yeola Sabha: शरद पवार यांनी मागीतली माफी, नागरिकांना अवाहनही केले; नाशिक येथील सभेत काय घडलं? घ्या जाणून)
मकरंद पाटील यांचे नाव मंत्रिपदाच्या यादीत होते. मात्र, शरद पवार यांच्या घराण्याशी चांगले संबंध असल्याने ते द्विधा मनस्थितीत होते. त्यामुळे अजित पवारांना कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय कळवतो, असे सांगितले होते.राष्ट्रवादीच्या फूटीनंतर शरद पवारांनी माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केलं. त्यावेळी मकरंद पाटील यांनी शरद पवारांच्या वाहनातून प्रवास केला होता. त्यामुळे मकरंद पाटील यांचा शरद पवारांना पाठिंबा असल्याची चर्चा होती.
काल दुपारी वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील शेकडो कार्यकर्त्यांसह मकरंद पाटील हे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले. यावेळी त्यांनी अजित पवारांसोबत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुनील तटकरे, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.