Online | Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ज्यांना शक्य असेल त्यांना घरातूनच काम करा असं आवाहन सरकार कडून येत आहे. कोरोना टाळण्यासाठी हा पर्याय सुरक्षित वाटत असला तरीही त्याचे मानसिक आणि शारिरीक दुष्परिणाम आता समोर येत आहे. मागील सहा महिन्यांपासून घरातच राहून काम करता करता अनेकांच्या घराचं घरपण हरवलं आहे. राग, चिडचिड वाढत आहे. यामधून आता थोडा वेगळा पर्याय म्हणून आमदार क्षितीज ठाकूर (MLA Kshitij Thakur) यांच्या संकल्पनेतून ‘वर्क फ्रॉम माय ऑफिस’ची (Work From My Office) मोफत सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी जुनं विवा महाविद्यालय, नवीन विवा महाविद्यालय आणि नालासोपारा येथील बहुजन विकास आघाडी भवन या तीन इमारतींमध्ये ऑफिससारख्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत. लोक इथे जाऊन काम करू शकतात. ही सेवा मोफत असेल. मुंबईतील नागरिकांमधील तणावाची पातळी उच्च स्तरावर तर चेन्नईत कमी; अभ्यासातून खुलासा

मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करण्याची सुविधा दिली. सुरुवातीला खूप सोयीच्या वाटणाऱ्या या सुविधेचे वेगळे परिणाम आता दिसू लागले आहेत. घरातून काम करताना अनेकदा कुटुंबासाठी असणारा वेळही कामासाठी द्यावा लागत असल्याने कौटुंबिक समस्यांमध्येही वाढ झाली आहे. त्याशिवाय घरातील इतर व्यक्तिंना मोकळेपणे वावरण्यावर निर्बंध आल्यासारखं होत आहे.

या सगळ्या गोष्टींमुळे कौटुंबिक कलह आणि ताणतणाव या समस्या वाढल्या आहेत. या बाबी लक्षात घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी आमदार क्षितीज ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली बहुजन विकास आघाडीने ‘वर्क फ्रॉम माय ऑफिस’ ही संकल्पना आणली आहे. या संकल्पनेअंतर्गत जुने आणि नवीन विवा महाविद्यालयाच्या इमारती आणि नालासोपारा येथील बहुजन विकास आघाडी भवनची इमारत इथे ऑफिससारखी सोय करून देण्यात येणार आहे.

वसई-विरार पट्ट्यात राहणाऱ्या आणि घरून काम करणाऱ्यांना या तीनही ठिकाणी ऑफिससारखं वातावरण मिळेल. इथे टेबल-खुर्चीबरोबरच गरज पडल्यास कम्प्युटरची व्यवस्था केली जाईल. त्याशिवाय वायफाय सेवा पुरवली जाणार आहे. विशेष म्हणजे ही सेवा मोफत उपलब्ध असेल. नेहमीच्या ऑफिसच्या वेळेत ही सेवा लोकांसाठी उपलब्ध असेल. लोक त्यांच्या वेळेत येऊन इथे बसून काम करू शकतील.

एखाद्या पक्षाचं कार्यालय असलेली इमारत सर्वसामान्यांचं ऑफिस म्हणून वापरण्याचा हा पहिलाच प्रकार असेल. सध्याची परिस्थिती पाहता लोकांना सर्व प्रकारे दिलासा देणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आपलं आणि लोकांचा पक्ष म्हणून बहुजन विकास आघाडीचं काम आहे, असं आमदार क्षितीज ठाकूर यांनी सांगितलं.

गेल्या पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ लोक घरातून काम करत आहेत. त्यामुळे घराचं घरपण गेलं असलं, तरी घरातून धड ऑफिससारखं काम करणंही शक्य नाही. ऑफिसमध्ये बसून काम करणं ही वेगळी गोष्ट असते. काम वेळेत आणि व्यवस्थित पार पडतं. त्यामुळेच आम्ही ही संकल्पना राबवत आहोत. यामुळे तरी घराचं घरपण परत येईल, अशी अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली.

या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी लोकांना एका लिंकवर नोंदणी करावी लागणार आहे. इंटरनेट कनेक्शनसोबत या ठिकाणी वीज, टेबल, खुर्च्या, पाणी आणि गरज पडल्यास खासगी कम्प्युटरही पुरवला जाईल. तसंच कोरोना काळात या अशा ठिकाणी काम करणं सुरक्षित वाटावं, यासाठी इथे येणाऱ्या प्रत्येकाचं तापमान आणि ऑक्सिजनची पातळी मोजली जाईल. त्याशिवाय सॅनिटायझर, मास्क आदी गोष्टी अनिवार्य असतील.