आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; अशोक चव्हाणांची जाहीर सभेत घोषणा
अब्दुल सत्तार (फोटो सौजन्य-फेसबुक)

अखेर काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी जाहीर सभेत या गोष्टीची घोषणा केली. भोकरदन येथे विलास औताडे यांच्या प्रचारार्थ अशोक चव्हाण आले होते. अब्दुल सत्तार हे कॉंग्रेसचे सिल्लोड येथील आमदार होते. कॉंग्रेसने औरंगाबाद येथे सत्तार यांच्या ऐवजी सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने सत्तार नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा देत लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची भूमिका घेतली होती.

यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, ‘काही लोक पक्षात राहून पक्षविरोधी कामे करत आहेत. जालन्यात एक भूमिका आणि औरंगाबादेत एक भूमिका असे चालणार नाही.’ याआधी जालन्यामधून सत्तार यांना उमेदवारी देऊ केली होती. मात्र, त्यांनी ती स्वीकारली नाही, त्यांनी औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मागितली होती. त्यानंतर पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती, त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. शेवटी सत्तार यांनी अपक्ष उमेदवार भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना पाठींबा दिला. महाराष्ट्रात दोन टप्प्यांमधील मतदान पार पडले आहे, आता शेवटचे दोन टप्पे बाकी आहेत. यामुळे ऐन मतदानाच्या तोंडावर कॉंग्रेसने घेतलेला निर्णय सत्तार यांच्यासाठी घातक ठरू शकतो असे राजकीय गोटात म्हटले जात आहे. (हेही वाचा: अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा डोळा, पंतप्रधान मोदींची सभा प्रताप चिखलीकर यांच्यासाठी ठरणार निर्णायक?

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद मतदार संघातून अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज भरला होता, परंतु सत्तार यांनी तो अर्ज मागे घेतला. अपक्ष म्हणून निवडणुक लढवल्यास पराभव होण्याची शक्यता फार होती. यासाठी अब्दुल सत्तार यांनी अर्ज मागे घेतला असल्याचे सांगितले जात आहे.