Save the Tiger Campaign: महाराष्ट्र सरकारच्या ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला Miss World च्या टीमचा पाठिंबा; वाघाच्या संरक्षण आणि संवर्धन याबद्दल जगभरात होणार अधिक जागृती
Save the Tiger Campaign (संग्रहित संपादित प्रतिमा)

Miss World Team Support Save the Tiger Campaign: जगातील वाघांची राजधानी म्हटल्या जाणाऱ्या चंद्रपूर येथे ‘ताडोबा फेस्टिव्हल’ दिनांक १ ते ३ मार्च दरम्यान होत आहे. त्याचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात ७१ व्या मिस वर्ल्डच्या टीमने राज्य सरकारच्या ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला पाठिंबा जाहीर केला. ११२ देशातून आलेल्या विश्वसुंदरींनी पाठिंबा जाहीर केल्याने वाघाच्या संरक्षण आणि संवर्धन याबद्दल जगभरात अधिक जागृती होईल, अशी भावना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या आठवड्यात ताडोबा फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यावेळेस ताडोबा सफारीचा आनंद घेण्यासाठी मिस वर्ल्ड टीमला आणि त्यातील स्पर्धकांना यावेळी निमंत्रण दिले.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, ‘वाघांची संख्या २०१६ मध्ये ३८९० होती, जी २०२३ मध्ये ५५७५ वर पोहोचली आहे. त्यातही भारत आणि नेपाळ दुप्पट आकड्यांसह आघाडीवर आहेत. मिस वर्ल्ड टीमचा जागतिक प्रभाव लक्षात घेता त्यांचे आदरातिथ्य करणे वाघांच्या संरक्षणाचे निरंतर यश जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे वाटते, जेणे करून आगामी अनेक पिढ्यांपर्यंत वाघ जंगलात राहू शकतील.’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही वाघाच्या संवर्धनासाठी ताडोबा अभयारण्यात झालेल्या प्रयत्नांचे कौतुक केले असल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा: E- Bus Service: कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापुरात धावणार ई बस, एकात्मिक परिवहन योजना राबविणार)

मिस वर्ल्ड संस्थेच्या प्रमुख आणि सीईओ श्रीमती जूलिया मॉरली म्हणाल्या, ‘आम्ही स्वतः सकारात्मक बदलाच्या ॲम्बेसेडर असल्यामुळे अशा विशिष्ट संदेशाचा प्रचार करणाऱ्या समारंभात आम्हाला आमंत्रित करण्यात आले, याचा आम्हाला अभिमान वाटतो. वाघ म्हणजे केवळ सौंदर्य आणि ताकदीचे प्रतीक नाही, तर आपल्या पृथ्वीतलावर पर्यावरणीय संतुलन साधण्यासाठी त्यांचे विशेष महत्त्व आहे. या सुंदर प्राण्यांना स्थिर भविष्य देण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न पाहून आम्हाला आनंद झाला आहे.’

या अभियानाचा उद्देश त्यांच्यापासून त्यांचे निवासस्थान हिरावून घेणे, त्यांची अवैध शिकार करणे आणि मनुष्य आणि वन्य जीवनातील संघर्ष यामुळे वाघांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या धोक्यांवर प्रकाश टाकण्याचा आहे. वाघांच्या संख्येत यशस्वीरित्या झालेली वाढ हा आसपास राहणाऱ्या समुदायांत आणि वन्यजीवांमध्ये सहजीवनास प्रोत्साहन देण्याबाबत सरकारच्या रणनीतींचा परिणाम आहे. हे यश साजरे करण्यासाठी ‘ताडोबा फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात येणार आहे.