प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

मीरा रोड (Mira Road)  येथे एका 30 वर्षीय विवाहित महिलेचा गर्भपाताच्या गोळयांच्या (Abortion Pills)  ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचे समजत आहे. याप्रकरणी महिलेचा पती, सासू, सासरे यांच्यासहित डॉक्टरवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या महिलेला एक वर्षाची मुलगी आहे. मृत्यू झाला त्यावेळी ती दोन महिन्यांची गर्भवती होती. दहा दिवसांपूर्वी म्हणजेच 2 मे रोजी तिचा मृत्यू झाला होता त्या नंतर शनिवारी तिचा पोस्टमोर्टम रिपोर्ट प्राप्त झाला ज्यामध्ये हा मृत्यू गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हर डोस झाल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले. गर्भवतीच्या जीवाला गंभीर धोका असल्यास पाच महिन्यांनंतरही गर्भपाताला आमच्या अनुमतीची गरज नाही- मुंबई उच्च न्यायालय

टाइम्स च्या वृत्तानुसार, महिला आणि तिचा पती डॉक्टरकडे गेले होते, त्यांना बाळ नको असल्याने डॉक्टरने त्यांना गर्भपाताच्या गोळया लिहून दिल्या. गर्भपाताच्या गोळयांमुळे महिलेच्या शरीरातून मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाला व ती बेशुद्ध झाली. यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे पोहचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान, 2 मे रोजी या महिलेचा मृत्यू झाल्यावर कश्मिरा पोलिसांनी हा अपघाती मृत्यू असल्याची नोंद केली होती. तसेच पोलिसांनी या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. यानंतर महिलेच्या पती, सासू सासरे यांच्यासोबत डॉक्टर आणि वैद्यकीय प्रतिनिधींवर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता Medical Termination of Pregnancy Act अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.