Coronavirus: निर्जंतुकीकरणासाठी उद्यापासून मंत्रालय दोन दिवस राहणार बंद; सीताराम कुंटे यांची माहिती

कोरोना विषाणूचे (Coronavirus) जाळे संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पसरत चालले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. एवढेच नव्हेतर, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ठिकाठिकाणी निर्जंतुकीकरण (Disinfection) करण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेल्या 2 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, अशी माहिती समोर आली होती. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यलयांचे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी उद्यापासून 2 दिवस बंद राहणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूने महाराष्ट्रात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. कोरोनामुळे महामारीची परिस्थिती उदभवली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रालय आणि नविन प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांचे निर्जंतुकीकरणाचे काम 29 आणि 30 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. हे देखील वाचा- कोरोना विषाणूबद्दल माहिती: बेस्टच्या 15 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण; एकाचा मृत्यू

ट्वीट- 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.