शिंदे गटाच्या आमदारांच्या पक्षांतरावर मंत्री Raosaheb Danve यांचे मोठे विधान; 'सामना'मधून केला होता दावा
Raosaheb Patil Danve | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या (Shivsena) गटातील काही आमदार भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) सामील होण्याच्या प्रयत्नात एक स्वतंत्र गट स्थापन करू शकतात, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने केला होता. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना (Saamana) वृत्तपत्रातील रोखठोक सदरमधून हा दावा केला गेला. आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी हा दावा पूर्णतः फेटाळून लावला.

भाजपचे ज्येष्ठ नेते दानवे म्हणाले की, शिंदे गट आणि त्यांचा पक्ष युतीत असून ते राज्य सरकार सुरळीत आणि कार्यक्षमतेने चालवत आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांना अशी पावले उचलण्याची गरज नाही. याउलट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार पक्षांतराच्या मार्गावर असल्याचा दावा दानवे यांनी केला. ते म्हणाले, शिंदे गटातील काही आमदार पक्षांतराचा विचार करत असल्याच्या अफवा विरोधक पसरवत आहेत, मात्र दुसरीकडे या विरोधी पक्षांच्या आमदारांनाच पक्षांतर करायचे आहे.

ते म्हणाले, शिंदे गट फुटण्याआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील आमदार फुटण्याची शक्यता आहे. आम्ही कोणताही राजकीय पक्ष फोडणार नाही आणि कोणाचेही सरकार पाडणार नाही, ही भूमिका 2019 च्या निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षाची आहे. शिंदे गटातल्या एकाही आमदाराला भाजपमध्ये घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (हेही वाचा: भाजप नेते Nitesh Rane यांची चलनी नोटांवर शिवाजी महाराजांचा फोटो छापण्याची सूचना)

दरम्यान, नुकतेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले होते की, महाराष्ट्रातील नागरी आणि ग्रामीण निवडणुकांसाठी युती करण्याचा निर्णय भाजपने स्थानिक नेतृत्वाला दिला आहे. जर युती झाली नाही तर त्यांचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल. शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी नुकतेच ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकीत भाजपशी मैत्रीपूर्ण लढत व्हायला हवी, असे सांगितले होते.