Coronavirus: राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोना विषाणूची लागण
Sanjay Bansode (PC - Twitter)

महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. उदगीर मतदासंघाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. संजय बनसोडे यांना मागील काही दिवसांपासून ताप आणि अंगदुखीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात त्यांचा कोरोना अहवाह पॉझिटिव्ह आला आहे.

संजय बनसोडे यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापूर्वी लातूर जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं होतं. (हेही वाचा - COVID19 Cases In Mumbai: मुंबईत आज 1115 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर, तर 57 जणांचा मृत्यू)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, लातूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी संजय बनसोडे कोरोना योद्ध्याप्रमाणे काम करत आहेत. बनसोडे हे सरकारी रुग्णालयात जाऊन तेथील कोरोना रुग्णांना धीर दित होते. मात्र, कोरोना सततच्या जनसंपर्कमुळे त्यांनादेखील कोरोना विषाणूची लागण झाली.

आतापर्यंत महाविकास आघाडीतील अनेक नेते कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकले होते. राष्ट्रवादी काँग्रस नेते जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.