Gulabrao Patil On Saamana: मंत्री गुलाबराव पाटील यांची शिवसेना मुखपत्र सामनावर टीका; ' हे म्हणजे उंदराला सापडली चिंधी, इथं ठेवू का तिथं असं झालंय'
Gulabrao Patil | (Photo Credit: Facebook)

राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दैनिक सामना (Saamana) संपादकीयावर टीकास्त्र सोडले आहे. दैनिक सामनातून होत असलेली टीका म्हणजे 'उंदराला सापडली चिंधी, ती इकडे ठेऊ की तिकडे ठेऊ, एवढंच काम चाललंय' अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली आहे. दैनिक सामनातून 'भाजप तुपाशी, शिंदे गट उपाशी. भाजपने डाव साधलाय. महत्वाची खाती आपल्याकडे ठेवलीत आणि शिंदेगटाला कमी महत्वाची खाती दिली' अशी टीका करण्यात आली होती. त्यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी असे म्हटले आहे.

गुलाबराव पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, सरकारमध्ये काम करताना कोणाकडे कोणतं खातं, यापेक्षा सरकारची सामूहिक जबाबदारी असते. मी पाणीपुरवठा मंत्री आहे म्हणजे माझी इतर खात्यावर जबाबदारी नाहीये का? मंत्र्यांची जबाबदारी राज्याच्या प्रत्येक विभागाचे काम करण्याची असते. त्यामुळे खातं कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकतं. त्यामुळे विरोधकांना काहीच सापडलं नाही म्हणून अशी टीका सुरू आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रदीर्घ काळ मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार रखडला. स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आगोदर या सरकारचे खातेवाटप झाले. त्यावरुन विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. (हेही वाचा, Independence Day 2022: राज्याला गतिमान करण्यासाठी सरकार दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करेन- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

दरम्यान, गुराबराव पाटील यांच्या टीकेला शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खरे तर सामनावर टीका करणारे गुलाबराव पाटील हेच उंदराच्या हातातील चिंधी आहे. दोन महिन्यांपूर्वी हेच गुलाबराव पाटील सामना आणि शिवसेना नेतृत्वाचे उदोउदो करत होते. आता त्यांना तोच सामना चिंधी वाटतो. दुसऱ्या बाजूला सामना म्हणजे कागदाचा लगता अशी टाका करणाऱ्या मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर टीका करताना अंबादासदानवे म्हणाले. लगदा जेव्हा उलटा होईल तेव्हा त्यांना कळेल.