म्हाडाच्या कोकण विभागातील घरांच्या लॉटरीचा निकाल (MHADA Konkan Board Housing Lottery) आता 5 फेब्रुवारी दिवशी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर सभागृहामध्ये निकाल जाहीर होण्यास सुरूवात होणार आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या म्हाडाच्या घरांसाठी जाहीर लॉटरीच्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. 2264 घरांसाठी ही लॉटरी जाहीर होणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी जाहीर सोडतीचा निकाल तुम्हांला ऑनलाईनही पाहता येणार आहे. म्हाडाची अधिकृत वेबसाईट housing.mhada.gov.in वर निकाल पहाता येईल. संध्याकाळी 6 नंतर विजेत्यांची नावं अपलोड केली जाईल.
ठाण्यातील म्हाडा लॉटरीच्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. 24,911 पात्र अर्जदारांपैकी 90% पेक्षा जास्त किंवा 23,574 अर्जदार 20 टक्के योजनेअंतर्गत 594 घरांसाठी सोडतीत सहभागी होतील. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या परवडणाऱ्या घरांच्या अंतर्गत, ही घरे मुंबईबाहेर ठाणे, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, ओरस, वेंगुर्ला आणि मालवण मध्ये बांधली आहेत.
अर्जदारांनी 20% घरांना पसंती दिली, तर इंटिग्रेटेड म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतील 15% घरांनाही मागणी होती. मात्र, या योजनेतील 713 घरांसाठी एकही अर्ज आलेला नाही. काहीच प्रतिसाद मिळाल्याने ही घरे रिकामीच राहणार असून, न विकलेल्या घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. Mhada Fake Website: सावधान! सायबर ठगांनी बनवली हुबेहुब म्हाडासारखीच वेबसाईट .
कोकण मंडळाने 11 ऑक्टोबर रोजी 2,264 घरांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ही प्रक्रिया 10 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार होती, 27 डिसेंबरला सोडत ठेवण्यात आली होती. मात्र, निर्धारित वेळेत अपेक्षित प्रतिसाद न आल्याने सोडत पुढे ढकलण्यात आली. दोनदा मुदतवाढीनंतर, आता 5 फेब्रुवारीदिवशी घरांच्या भाग्यवान विजेत्यांची नावं समोर येणार आहेत.