म्हाडा (Photo Credits-Facebook)

म्हाडा (MHADA) कडून घेण्यात आलेल्या सरळसेवा भरतीसाठीच्या परीक्षेची उत्तरतालिका अर्थात Answer Key आता प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारा 565 जागांवर नोकरभरती होणार आहे. दरम्यान ही परीक्षा 31 जानेवारी,1, 2 फेब्रुवारी, 3, 7 , 8 ,9 फेब्रुवारी या 7 दिवशी परीक्षांचं आयोजन करण्यात आलं होते. या परीक्षेत तांत्रिक घोळामुळे आणि पेपरफुटीमुळे बरीच चर्चा झाली होती.

म्हाडा साठी टीसीएस द्वारा घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या Answer Key मध्ये आक्षेप नोंदवण्यासाठी आता विद्यार्थ्यांना 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंतचा अवधी देण्यात आला आहे.

म्हाडा सरळसेवा भरती 2021 अंतर्गत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ई-मेल आयडीवर आज लिंक दिली जाणार आहे. त्यावर त्यांनी दिलेल्या परीक्षेचा पेपर त्यांच्या उत्तरांसह पाहता येणार आहे. तसेच त्यांना उत्तरतालिका देखील पाहता येईल, असं महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे सचिव यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

म्हाडा परीक्षेमध्ये आन्सर की नंतर आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना www.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट वर आक्षेप नोंदवण्याची सोय असेल ही सेवा सशुल्क असणार आहे. एका प्रश्नपत्रिकेसंबंधी आक्षेपासाठी विद्यार्थ्यांना 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13 जागा, उप अभियंता (स्थापत्य) 13 जागा, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी 02 जागा, सहायक अभियंता (स्थापत्य) 30 जागा, सहायक विधी सल्लागार 2 जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119 जागा , कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ सहायक 6 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 44 जागा, सहायक 14 जागा, वरिष्ठ लिपीक 73 जागा, कनिष्ठ लिपीक- टंकलेखक 207 जागा, लघूटंकलेखक 20 जागा, भूमापक 11 जागा आणि अनुरेखक 07 अशा एकूण 565 जागांवर नोकरभरती होणार आहे.