
मागील आठवड्यात पावसाने घातलेल्या थैमानानंतर रेल्वेच्या तीन ही मार्गांवर वाहतूक विस्कळीत झाली होती, पावसाचा जोर ओसरल्यावर देखील कुठे ओव्हरहेड वायर तुटल्याने, तर कुठे लोकल वर झाड कोसळल्याने लोकलसेवा रखडतच सुरु होती, या सर्व तांत्रिक व नैसर्गिक समस्यांवर पर्यायी उपाय करण्यासाठी आज म्हणजेच 7 जुलै 2019 ला रेल्वेच्या तीन ही मार्गांवर मेगाब्लॉक (Mega block) घेण्यात येणार आहे. यामध्ये सिग्नल यंत्रणेतील बिघाड तसेच रेल्वेरुळांची दुरुस्ती अशी कामे प्राधान्याने करण्यात येतील.
आज , ब्लॉक कालावधीत मध्य व पश्चिम रेल्वे वरील वाहतूक साधारण 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु असले तर हार्बर मार्गावर वाशी, पनवेल, बेलापूर मधून सीएसएमटी कडे जाणाऱ्या सर्व लोकल रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवासाला निघण्याआधीच जाणून घ्या आजच्या ब्लॉकचे सविस्तर वेळापत्रक..
जाणून घ्या उद्या कुठे असेल मेगाब्लॉक
मध्य रेल्वे:
माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन जलद मार्गावर उद्या सकाळी 10.30 पासून दुपारी 3.30 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळेत जलद मार्गावरील लोकलची वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात येईल तसेच सर्व गाड्या आपल्या गंतव्य स्थानी नेहमीपेक्षा 15 ते 20 मिनिटे उशिराने पोहचतील
हार्बर रेल्वे :
मानखुर्द ते वडाळा रोड अप व डाऊन दोन्ही मार्गांवर उद्या सकाळी 11.10 पासून ते दुपारी 3. 40 पर्यंत ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सकाळी 10.21 ते दुपारी 3.47 यादरम्यान पनवेल, वाशी, बेलापूर वरून सीएसएमटी कडे जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द राहतील. प्रवाशांसोयीसाठी पनवेल ते मानखुर्द दरम्यान विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे तसेच ब्लॉकच्या वेळेत प्रवाशांना मॅम लाईनवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे .
पश्चिम रेल्वे :
उद्या सकाळी 10. 35 ते दुपारी 3.35मध्ये सांताक्रूझ ते माहीम स्थानकाच्या दरम्यान पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात येईल तसेच महालक्ष्मी, प्रभादेवी माटुंगा स्थानकात लोकल थांबणार नाही. याशिवाय काही लोकलफेऱ्या रद्द असणार आहेत.
या आठवड्यात रेल्वे मार्गाची विस्कळीत सुविधा पाहता हा ब्लॉक घेणे खरोखरच गरजेचे असणार आहे, मात्र यानंतर येत्या आठवड्यात तरी प्रवाशांची लोकल समस्यांपासून सुटका होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.