Megablock Updates 14th July: आज तीन ही रेल्वे मार्गांवर पाच तासांचा मेगा ब्लॉक, जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक
लोकल ट्रेन | प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

Megablock: आज, रविवारी म्हणजेच 14 जुलै ला मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गावर पाच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे (Central Railway)  मुख्य मार्गावर कल्याण (Kalyan) ते ठाणे (Thane) अप जलद मार्ग, हार्बर (Harbour Railway) वर पनवेल (Panvel)  ते वाशी (Vashi) , नेरुळ (Nerul), बेलापूर (Belapur)  ते खारकोपर (Kharkopar) दरम्यान दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर(Western Railway)  मरिन लाइन्स (Marine Lines)  ते माहिम (Mahim) दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक असल्याचे रेल्वेने सांगितले. मध्य रेल्वे मुख्य मार्ग व पश्चिम रेल्वेवरील लोकल फे ऱ्या पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावतील. प्रवाशांनी खोळंबा टाळण्यासाठी बदललेल्या वेळा लक्षात घेऊन बाहेर पडणे अधिक सोयीस्कर ठरेल.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर आज सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकच्या कालावधीत अप जलद मार्गावरील लोकल कल्याण ते ठाणे दरम्यान धिम्या मार्गावर चालवण्यात येतील. तर याच लोकल ठाणे स्थानकाच्यानंतर पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ठाणे ते सीएसएमटी दरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा स्थानकांत थांबतील.

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वेच्या पनवेल ते वाशी, नेरुळ, बेलापूर ते खारकोपर दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी 11.30 पासून ते दुपारी 4.00 पर्यंत दुरुस्तीची कामे पार पडणार आहेत. दरम्यान, पनवेल ते अंधेरी सेवा रद्द केली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पनवेल ते ठाणे आणि सकाळी 11.14 ते 3.20 पर्यंत ठाणे ते पनवेल लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. ठाणे ते वाशी/ नेरूळ लोकल सेवा वेळापत्रकानुसार चालविण्यात येतील. सकाळी 11 ते दुपारी 3.32 पर्यंत बेलापूर ते खारकोपर आणि सकाळी 11.30 ते सायंकाळी 4  पर्यंत खारकोपरहून सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे

मरिन लाइन्स ते माहिम दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.35 पासून दुपारी 3.25 पर्यंत ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे.परिणामी, बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या लोकल मरिन लाइन्स ते माहिम दरम्यान जलद मार्गावर धावतील. तसेच महालक्ष्मी, प्रभादेवी व माटुंगा स्थानकात डाऊन धिम्या मार्गावर लोकल गाडय़ा थांबणार नाहीत.