Tikona Fort,Headphone | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

खाली पडलेला हेडफोन (Headphone) उचलण्याच्या नादात मेडिकल कॉलेजच्या एका विद्यार्थ्याचा ( Medical Student) मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजणेच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval Taluka) तालुक्यातील तिकोना (Tikona Fort) गडावर घडली. प्राप्त माहितीनुसार हार्दिक माळी (वय 25 वर्षे) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील राहणारा आहे. हार्दिक हा आपल्या मित्रांसह भटकंती करण्यासाठी तिकोना गडावर गेला होता. या वेळी त्याचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेनंतर तिकोना गडावर आणखीही 5 जण अडकले असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सायंकळापर्यंत सुरु होते. दरम्यान, हेडफोन काढताना मृत्यू झाल्याच्या दाव्यास प्रशासनाकडून मात्र दुजोरा मिळू शकला नाही.

घटनेविषयी अधिक माहिती अशी की, हार्दिक माळी हा आपल्या मित्रांसोबत तिकोना गडावर भटकंती करत होता. दरम्यान, त्याचा पाय घरसरला आणि तो खाली कोसळला. उंचावरुन खाली आपटल्याने हार्दिक याला जोरदार मार लागला तसेच तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. हार्दिक खाली कोसळल्याचे समजताच त्याच्या इतर मित्रांनी त्याच्याकडे धाव घेतली. मात्र, हे करत असताना हे मित्रही कड्यावर अडकले. कड्यावर अडकलेल्या एकूण मित्रांपैकी तिघा जणांना मागे आणण्यास यश आले मात्र दोघे अद्यापही कड्यात अडकले होते. त्यांना परत आणण्याचे काम सायंकाळी उशीरपर्यंत सुरु होते. (हेही वाचा, नाशिक: त्र्यंबकेश्वर येथील धबधब्यात 3 विद्यार्थी बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांचा शोध सुरु)

सुरुवातीला हे तरुण मदतीसाठी याचना करत होते. दरम्यान, घटनेची माहिती मावळ तालुका प्रशासनाला कळाली. त्यांनी तातडीने पावले टाकत घटनास्थळी एक पथक मदतीसाठी पाचारण केले. हे पथक आणि दुर्गवाडीची टीम वैनतेयचे कार्यकर्ते संयुक्तरित्या मदत आणि बचावकार्य करत होते. दरम्यान, खाली पडलेला हेडफोन काढताना हार्दिक याचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला असा दावा करण्यात येत आहे. मात्र, पोलीस अथवा तालुका प्रशासनाकडून त्यास दुजोरा मिळाला नाही. हार्दिक याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.