Maharashtra Monsoon Session Day 2: महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशीच्या कामकाजात वैद्यकीय शिक्षणमंंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांंनी एक महत्वाची घोषणा केली आहे. यापुढे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी (Medical Entrance Update) वापरला जाणारा 70:30 हा कोटा फॉर्म्युला रद्द करण्यात आला आहे असे देशमुख यांंनी सांंगितले आहे. यापुढे वन स्टेट, वन मेरिट या नियमाने आरोग्य विज्ञान पदवीसाठी प्रवेशोत्सुकांना त्यांच्या NEET परिक्षेतील गुणवत्तेनुसारच प्रवेश दिला जाणार असल्याचे सांंगण्यात आले आहे. 70:30 मुळे गुणवंत विद्यार्थी वंचित राहतात, म्हणून राज्य सरकार हा कोटा रद्द करत आहे असे सांंगत अमित देशमुख यांंनी विधानभवनात ही घोषणा केली आहे.
Maharashtra Monsoon Session: ठाकरे सरकार बाय बाय म्हणत भाजप चे विधानभवन परिसरात आंदोलन (See Photo)
राज्यातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयात मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र असे वर्गीकरण करून प्रवेश दिले जात असताना स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात, तर उर्वरित 30 टक्के जागांवर राज्यातील इतर भागांतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो. मराठवाडा आणि विदर्भात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या कमी असल्याने त्यांंच्यावर अन्याय होतो. त्यात अगोदरच जातीय आरक्षण असताना प्रादेशिक आरक्षणामुळे अनेक गुणवंंत विद्यार्थ्यांंना प्रवेश मिळत नाही. याच समस्या लक्षात घेत आता महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे ज्यास महाविकास आघाडी सहित विरोधी पक्ष भाजपने सुद्धा पाठिंंबा दर्शवल्याचे समजत आहे.
महाराष्ट्र कॉंग्रेस ट्विट
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमधील( NEET) 70:30 फॉर्म्युला रद्द. आता महाराष्ट्रामध्ये ‘वन महाराष्ट्र वन मेरिट’ ही नवी प्रक्रिया सुरु होणार. आरोग्य विज्ञान पदवीसाठी प्रवेशोत्सुकांना त्यांच्या NEET परिक्षेतील गुणवत्तेनुसारच प्रवेश प्राप्त होणार: वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. अमित देशमुख pic.twitter.com/4Vk2OiQ0WD
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 8, 2020
महाराष्ट्र सरकारच्या या नव्या निर्णयानुसार आता वैद्यकीय अभ्यासक्रमात राज्यातील विद्यार्थ्यांना नीट परिक्षेतील गुणवत्ता यादीनुसार प्रवेश मिळनार आहेत. राज्यातील कोणत्याही भागांतील महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश घेऊ शकणार आहेत.