Maharashtra Rain Update: राज्यात मुसळधार पावसाची संततधार कायम आहे. खास करुन पावसाने मराठवाडा झोडपून काढला आहे. त्यामुळे मराठवाड्यात महापूराचे (Marathwada Rain Update) संकट निर्माण झाले आहे. हजारो हेक्टर जमीनीवरील शेती पाण्याखाली गेली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा तर संपर्कही तुटला आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसामुळे चिंता आणखीच वाढली आहे. नांदेड, हिंगोली, परभणी आदी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाची संततधार अद्यापही कायम आहे. त्यामुळे आगामी काळात काय परिस्थिती निर्माण होते याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
नांदेडमध्ये मुसळधार
नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे महापूर आला आहे. संभाव्य धोका विचारात घेऊन प्रशासनाने शाळांना सुट्टी दिली आहे. मुसळधार पवासामुळे पीकं पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. गणपूर, सेलगाव, कोंढा, पिंपळगाव, मुदखेड या गावांमध्ये पाणी शिरलं आहे. या गावांचा शहरांशी संपर्क सुटला आहे. (हेही वाचा, Maharashtra Rain Update: राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, पुढचे तीन दिवस सतर्कतेचा इशारा)
आसना नदीला महापूर
आसना नदी पूरग्रस्त झाली आहे. नदीने पाण्याची धोकादायक पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पाणी नदीपात्राबाहेर येण्याची शक्याता वाढली आहे. काही ठिकाणी ते आलेही आहे. प्रामुख्याने सोयाबीन, केळी, ऊस, उडीद, मूग, कापूस, हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे. ही पिके पाण्याखाली गेली आहेत.
नांदेडमध्ये पाणीच पाणी
नांदेड शहरातील कौठा, सिडको, मुदखेड, मुखेड अर्धापूर आदी भागात पाणी शिरले आहे. शेलगाव खु, शेलगाव बु, शेणी, कोंढा, देळूब खु, देळूब बु या गावातही अनेक गावे संपर्काबाहेर गेली आहेत.
हिंगोलीतही पाणीच पाणी
हिंगोली तालुक्यातील कुरुंदा किन्होळा आसेगा शहरात पाणी शिरले आहे. संभाव्य स्थितीवर तोडगा काढण्यासाठी पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.
दरम्यान, राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अतिमहत्त्वाचे असणार आहेत. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. या शिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.