राज्य मंत्रिमंडळाची (Marathwada Cabinet Meeting) एक महत्त्वपूर्ण बैठक आज मराठवाड्यात पार पडत आहे. तब्बल सात वर्षांनी ही बैठक पार पडत असल्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत अनेक निर्णय होऊन महत्त्वाच्या घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. शिवाय मराठवाड्याचा अनुशेष भरुण काढण्यासाठी जवळपास 40 हजार कोटी रुपयांचे एखादे पॅकेजही दिले जाणार असल्याची चर्चा आहे. ही बैठक पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार पडणार आहे. मात्र, त्यावरुन जोरदार टीका झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde) निर्णय बदलल्याने बैठक अन्यत्र घेतली जाणार असल्याचे समजते.
मराठवाड्यातील बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह राज्य मंत्रिमंडळ उपस्थित आहे. बैठकीमुळे औरंगाबाद शहराला अतिशय महत्त्व आले आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त आणि फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार शहराला छावणीचे स्वरुप आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विवध संघटनांकडून मोर्चेही निघणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे.
हायहोल्टेज बैठकीसाठी मोठाच लवाजमा मराठवाड्यात आला आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांसह जवळपास 29 मंत्री उपस्थित राहणार आहेत. शिवाय त्यांच्यासोबत 39 सचिव, स्वीय सहायक आणि विशेष अधिकारीही शहरात दाखल होणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी जवळपास 400 सरकारी अधिकारी आणि 350 वाहनांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. दुपारी होणारी ही बैठक संध्याकाळ किंवा रात्री उशीरपर्यंत लांबू शकते. या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे शासकीय ध्वजारोहण केले जाणार आहे. एकूण नियोजित कार्यक्रम पूर्ण होताच मुख्यमंत्री दिल्लीला रवाणा होणार असल्याचे समजते. त्यांच्या दिल्ली दौऱ्याचे कारण समजू शकले नाही.
दरम्यान, कॅबिनेट बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत उपस्थित राहणार असल्याचे समजते. संजय राऊत हे सामना दैनिकाचे संपादक आणि एकेकाळचे वार्ताहर आहेत. या पत्रकार परिषदेस खरोखरच उपस्थित राहणार आहात का? असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता राऊत यांनी निश्चीत असे उत्तर दिले नाही. मात्र, औरंगाबाद पोलिसांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राऊत यांनी या पत्रकार परिषदेसाठी पास घेतला आहे.