Twitter Account Suspended: अजित पवार गटाला 'हायटेक' धक्का; ट्विटर अकाऊंट निलंबीत
Ajit Pawar Faction | (Photo credit: archived, edited, representative image)

Ajit Pawar faction Twitter Account Suspended: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) अजित पवार गट वापरत असलेला @NCPSpeaks1 हे ट्विटर अकाऊंट निलंबीत करण्यात आले आहे. त्यामुळे या गटाला हायटेक धक्का बसल्याचे मानले जात आहे. पाठीमागील दोन दिवसांपासून या अकाऊंटवर जाताच निलंबनाचा मेसेज पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाने केलेल्या तक्रारीनंतर एक्सकडून ही कारवाई करण्यात आली. एक्स (X) हे पूर्वी ट्विटर नावाने ओळखले जात असे. मात्र, एलन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यात बदल करण्यात आला.

एकानथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात बंड करुन भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर अवघ्या काहीच दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही त्याची पुनरावृत्ती घडताना दिसत आहे. अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सवता सुभा मांडत सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप यांच्यासोबत हातमिळवणी केली. अजित पवार यांनी आपल्या नऊ सहकाऱ्यांसह आणि इतर आमदारांचाही पाठिंबा असल्याचा दावा करत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सहाजिकच पक्षांतर्गत असलेला हा वाद आता निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वेगळा गट केल्यानंतर आता सोशल मीडियातही विभागणी पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाने एक्सवर @NCPSpeaks1 नावाने स्वतंत्र अकाऊंट सुरु केले. अर्थात @NCPSpeaks नावाने आगोदरच एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत एक्स अकाऊंट सुरु होते. राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यावर अजित पवार वेगळे झाले असले तरी ट्विटरवरचे मूळ अकाऊंट शरद पवार गटाकडे आहे. त्यामुळे अजित पवार यांनी अगदी त्याच नावाशी साधर्म्य असलले एक्स अकाऊंट सुरु केले. ज्यावर शरद पवार गटाने आक्षेप घेतला. परिणामी हे अकाऊंट एक्सने निलंबीत केले.

दरम्यान, अजित पवार गटाने एक्स अकाऊंट निलंबीत झालेबद्दल आपली भूमिका माडंली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही आमचे म्हणने एक्सकडे मांडले आहे. त्यामुळे आज सायंकाळपासून अकाऊंट पूर्ववत होईल.