अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या पाठोपाठ आता सविता मालपेकर सुद्धा हाती बांधणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ
Savita Malpekar (Photo Credits: Instagram)

मराठी सिनेनाट्य सृष्टीतील गाजलेलं नाव राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) घड्याळ आपल्या हाती बांधणार आहे, हे नाव म्हजे अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar). टीव्ही9 मराठी च्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत सविता मालपेकर पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यांच्या सोबतच गीतकार आणि अभिनेते असेलेले बाबा सौदागर (Baba Saudagar), अभिनेत्री अर्चना नेवरेकर (Archana Nevrekar)  हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Brede) यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता, पक्षप्रमुख शरद पवार (Sharad Pawar)  यांना कलेची जाण आहे त्यांनी नेहमीच कलाकारांचा मान ठेवला आहे आणि त्यामुळेच कलाकारांचं नेतृत्व म्हणून राजकारणात प्रवेश करताना आपण राष्ट्रवादीची निवड करत आहोत असे मत प्रिया यांनी व्यक्त केले होते.

मागील काही काळात प्रिया बेर्डे यांच्यसहितचअभिनेते सिध्देश्वर झाडबुके, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे मिलिंद आष्टेकर या मंडळींचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे

आता अभिनेत्री सविता मालपेकर या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. मालपेकर यांनी 1988 मध्ये ‘आई पाहिजे’ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. ‘काकस्पर्श’ सिनेमात भूमिकेसाठी त्यांनी संपूर्ण केशवपन केले होते. हाहाकार, कुंकू लावते माहेरचं, गड्या आपला गाव बरा, स्वामी पब्लिक लिमिटेड, नटसम्राट, मुळशी पॅटर्न, शिकारी, मी शिवाजी पार्क, 7 रोशन व्हिला अशा सिनेमात त्यांनी भूमिका केल्या आहेत. ‘हथियार’ या हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका केली आहे.