Manoj Jarange Patil | Twitter

मराठावाड्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नी उपोषणावर बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  यांनी आज 17 दिवसांनंतर उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते फळांचा ज्यूस घेऊन त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. त्यामुळे सरकारला या आरक्षणाचा तिढा सोडवण्यात यश आलं आहे. काही दिवसांपूर्वी सरकारकडून अध्यादेश काढत निजामकाळी वंशावळीचे दाखले दाखवून कुणबी समाजाचा दाखला घ्या असं सांगण्यात आले होते. पण जरांगे यांनी सरसकट आरक्षण देण्याचा आग्रह केला आहे.

आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जालना मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पोहचले होते. यावेळी त्यांच्यासोबत अर्जुन खोतकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, गिरिश  महाजन, संदिपान भुमरे, उदय सामंत उपस्थित आहेत. जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. नक्की वाचा: Manoj Jarange Protest Update: गावकर्‍यांच्या अट्टाहासासमोर मनोज जरांगेंनी झुकत सलाईन घेतलं; पुढील निर्णयाकडे सार्‍यांचे लक्ष .

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे असेही जरांगे पाटील म्हणाले आहेत.  तसेच वेळ घ्या पण आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी आंदोलकांसमोर पुन्हा एकनाथ शिंदे यांना केलं आहे. यावेळी जरांगे यांचे वडीलही स्टेज वर उपस्थित होते.  मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट पासून उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील यांच्या अन्य दोन मागण्या सरकार कडून पूर्ण करण्यात आल्या आहेत.