खासदार संभाजी राजे (Sambhaji Chhatrapati) मराठा आरक्षणासह (Maratha Reservation) समाजाच्या इतर मागण्यांसाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाला न्याय मिळावा, ज्या शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचे नेतृत्व केले, ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला पहिले आरक्षण दिले, त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीसह मराठा समाजाचा समावेश होता. आता त्याच समाजासाठी आज माझा लढा आहे, असे ते म्हणाले होते. आता हे आमरण उपोषण नेमके कशासाठी? आपल्या नेमक्या मागण्या काय आहेत, हे संभाजी राजेंनी ट्वीटद्वारे स्पष्ट केले आहे.
संभाजी राजे म्हणतात, ‘मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आंदोलकांच्या वारसांना नोकरी देण्याची घोषणा सरकारनेच केली होती. मात्र कुणालाही नोकरी दिलेली नाही. याउलट काही वारसांना एसटी महामंडळात नोकरी देण्याचे प्रस्तावित केले जात आहे, हे समाजाला मान्य नाही. विशेष बाब म्हणून निर्णय घेऊन सरकारी नोकरी देण्याचा निर्णय शासन घेऊ शकते.’
‘मराठा आरक्षण मिळवणे, हे आपल्या सर्वांचे प्रमुख उद्दिष्ट असले तरी, ती एक दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रमुख मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी व मराठा समाजाची आरक्षणावाचून होणारी होरपळ कमी करावी, याकरिता आपण उपोषणास बसत आहे. तसेच, या मागण्यांसोबत मराठा आरक्षण मिळण्यासाठी न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींची देखील अंमलबजाणी करण्यास तात्काळ सुरूवात करून, लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लागणारी प्रक्रिया सुरू करावी.’ (हेही वाचा: अहवालावर मुख्यमंत्र्यांची सही नसल्याने एसटी विलिनीकरणावर अद्याप निर्णय नाही, पुढील सुनावणी शुक्रवारी)
२६ फेब्रुवारी पासून मी आझाद मैदानावर #आमरण_उपोषणास बसणार आहे, ते #नेमके_कशासाठी ? हे सर्वप्रथम सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे.
मराठा आरक्षण मिळवणे, हे आपल्या सर्वांचे प्रमुख उद्दिष्ट असले तरी, ती एक दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रिया आहे. pic.twitter.com/wgEeC6I1Vf
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 21, 2022
‘आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे दिला जाणारा दहा लाख रूपये कर्ज व्याज परतावा हा 25 लाख रुपये करण्यात यावा, या मागणीवर सरकारने सकारात्मकता दाखवली होती. मात्र अद्यापही याची अंमलबजावणी केलेली नाही. महामंडळ व्यवस्थित चालण्यासाठी, प्रशासकिय निर्णय घेण्यासाठी तसेच नविन योजना निर्माण करण्यासाठी महामंडळास संचालक मंडळ असणे गरजेचे आहे. तसेच सध्या महामंडळाचे सदस्य सचिव तथा कार्यकारी संचालक शासकिय अधिकारी देखील नाही. महामंडळास कायमस्वरुपी कार्यकारी संचालक व संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात यावी. तसेच, याबाबतीत मान्य केलेल्या सर्व मागण्या तातडीने अंमलात आणाव्यात.’
दरम्यान, यापूर्वी 15 फेब्रुवारी रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजी राजेंच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला होता. संभाजी राजे यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ 3 मे 2022 रोजी संपत आहे. राज्यात फडणवीस सरकार असताना भाजपने संभाजी राजे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 13 जून 2016 रोजी संभाजी राजे यांना राज्यसभेवर नामनिर्देशित करण्यात आले.