Mansukh Hiren यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर पत्नी विमल हिरेन यांची पहिली प्रतिक्रीया; पहा काय म्हणाल्या
Dead Body | Representational Image (Photo Credits: Pixabay)

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. आज मुंब्रा येथील खाडीत त्यांचा मृतदेह सापडला. हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी विमल हिरेन (Vimal Hiren) यांची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी माझे पती मनसुख हिरेन आत्महत्या करुच शकत नाहीत असा दावा केला असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणीही केली आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. त्यानंतर पोलिस जेव्हा कधी फोन करायेच तेव्हा माझे पती चौकशीसाठी जात असतं. नेहमीप्रमाणे कालही फोन आला. कांदिवली क्राईम ब्रॉंचमधून तावडे नामक एका व्यक्तीने त्यांना बोलावून घेतलं. त्यानंतर ते गेले पण परत आलेच नाहीत. 10 वाजल्यानंतर त्यांचा फोनही बंद झाला. रात्रभर वाट पाहिल्यानंतर आम्ही सकाळी तक्रार दाखल केली.

दरम्यान, हिरेन यांनी आत्महत्या केल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. ते आत्महत्या करुच शकत नाहीत. या सगळ्याचा आमच्या कुटुंबियांना खूप त्रास होत आहे. या प्रकरणाचा पूर्ण तपास व्हायला हवा, अशी मागणीही विमल हिरेन यांनी केली. (Mansukh Hiren मृत्यूचा तपास ATS कडे सुपूर्त; गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा)

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर  विधीमंडळात आज एकच गदारोळ झाला असून हे प्रकरण NIA कडे सोपवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. परंतु, महाराष्ट्र पोलिस सक्षम असल्याने हा तपास ATS कडे सोपवण्यात आल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.