Maharashtra Home Minister Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणातील गाडीमालक मनसुख हिरेन यांचा आज मृत्यू झाला असून मुंब्रा येथील खाडीत त्यांचा मृतदेह आढळला. दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता ए.टी.एस. (ATS) कडे  देण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले होते. तसंच त्यांनी संशयाला वाव असणारे अनेक पुरावे समोर येत असून या प्रकरणाचा तपास NIA ला देण्याची मागणी फडणवीसांनी केली होती.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले की,  त्यानंतर आता हे प्रकरण ATS कडे सोपवण्यात आले आहे. विरोधी पक्षाने या घटनेचा तपास केंद्रीय संस्था NIA कडे देण्याची मागणी केली होती. परंतु, महाराष्ट्र पोलिस सक्षम असल्याने हा तपास महाराष्ट्राच्या ATS कडे सोपवण्यात आला आहे.

अनिल देशमुख ट्विट:

25 फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अन्टीला जवळ एक अज्ञात स्कॉर्पिओ आढळली होती. या स्कॉर्पिओमध्ये 2.5 किलोग्रॅम जिलेटीन स्फोटक सापडले होते. तसंच या गाडीत असलेल्या पत्रात अंबानी यांच्या कुटुंबियांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर ही गाडी चोरीची असून या गाडीचे मालक मनसुख हिरेन असल्याचे समोर आले होते. परंतु, ही कार नेमकी कोणी पार्क केली याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, हिरेन हे गुरुवारपासून बेपत्ता होते. याप्रकरणी कुटुंबियांनी नौपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आज त्यांचा मृतदेह कळवा खाडीत आढळल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी विधानसभेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक होत अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यात त्यांनी सचिन वाझे यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी या प्रकरणाचा तपास सचिन वाझे करत होते. मात्र दोन दिवसापूर्वीच या प्रकरणाची जबाबदारी सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.