दिलीप वळसे पाटील । PC: Twitter/ANI

महाराष्ट्रात सुरूवातीला भोंगा आणि आता शिवसेना विरूद्ध भाजपा, राणा दाम्पत्य यामुळे पोलिसांवरील ताण वाढत असल्याचं चित्र आहे. अशामध्ये उद्या, 24 एप्रिल दिवशी पंतप्रधानांचा मुंबई दौरा आहे. त्यामुळे मागील काही घटनांचा दाखला देत आज मुंबई मध्ये भाजपा नेत्यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याचं सांगत मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन देणार असल्याचं जाहीर केले आहे. पण यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home minister Dilip Walse Patil) यांनी आपली प्रतिक्रिया देताना स्थिती नियंत्रणात असल्याचं म्हटलं आहे. राज्यात ही स्थिती बिघडू नये म्हणून सर्व ते प्रयत्न करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांचे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मीडीयाशी बोलताना त्यांनी भाजपाने केलेल्या आरोपांचाही समाचार घेतला आहे. मनोज कंबोज यांच्या गाडीवरील हल्ला हा छोटा प्रकार आहे. ते तिथे कोणत्याही कारणाशिवाय गेले होते. तर रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याबाबत बोलणं त्यांनी टाळलं आहे. मुंबई पोलिस त्यांचं काम करत आहेत आणि पोलिस आयुक्त परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात भोंगा उतरवण्यावरून 3 मे पर्यंत मनसे ने सरकारला अल्टिमेटम दिलं आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी 25 एप्रिलला सर्वपक्षीय बैठक होणार आहे. प्रत्येकी पक्षाचे 2 नेते उपस्थित असतील आणि ते एकत्र निर्णय घेतील असेही म्हटलं आहे. दरम्यान राज ठाकरेंच्या औरंगाबाद मधील सभेच्या परवानगीचा निर्णय स्थानिक पोलिस आयुक्त घेतील असेही त्यांनी म्हटलं आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचे आरोप फेटाळून लावले आहे. आपण स्वतः अमरावतीच्या पोलिसांशी बोललो असून तेथे त्यांच्या घराला सुरक्षा व्यवस्था पुरवली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आज दुपारी काही वेळापूर्वी भाजपाच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलिस आयुक्तांना भेटून आपलं निवेदन दिलं आहे.