Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मराठा आरक्षण आंदोलनाचे वर्तमानातील प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी ( Manoj Jarange Patil Threat) आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या धमकीमुळे खळबळ उडाली असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. एका युट्युब चॅनेलवरबजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेट अकाऊंटवरुन केलेल्या कमेंटच्या माध्यमातून ही धमकी आल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा वाढवली असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील हे आपले उमेदवार उभे करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे त्यांना राजकीयदृष्ट्या भेटायला येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
बजाज बिश्नोई लीडर नामक अकाऊंटवरुन धमकी
विधानसभा निवडणूक 2024 काळात मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून भेटायला येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. अशा वेळी आपणही त्यांना इच्छुक म्हणून भेटायला जाणार आणि त्यांचा गेम करणार अशा आशयाची धमकी बजाज बिश्नोई लीडर नामक अकाऊंटने दिली आहे. ही धमकी येताच पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. त्यांना भेटाला येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. (हेही वाचा, Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; विधानसभा निवडणूकीत इच्छुकांना अर्ज भरण्याच्या सूचना)
जरांगे यांच्या आंदोलनाचा भाजपला फटका
मराठा आरक्षण मुद्द्यावरुन प्रदीर्घ काळ मनोज जरांगे पाटील हे संघर्ष करत आहेत. अनेक वेळा त्यांनी आमरण उपोषणेही केली आहेत. आंदोलन आणि उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी आपले संघटन उभे केले आहे. त्याचा मोठा प्रभाव लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. मानले जाते की, जरांगे यांच्या संघटनामुळे सत्ताधारी भाजपला मोठा झटका मिळाला. त्यांच्या खासदारांची संख्या प्रचंड घटली. त्यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी मोठे यश मिळवताना दिसली. तर महायुतीचा पराभव झाला.
जरांगे समर्थकांकडून निवडणूक अर्ज दाखल
प्राप्त माहितीनुसार, जरांगे पाटील यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये चार ते पाच जणांनी आपापले निवडणूक अर्ज भरुन ठेवावेत. येत्या 29 किंवा 30 तारखेच्या दरम्यान उमेदवारांची नावे जाहीर करु. त्यात अर्ज भरले तरी चिन्ह आल्याशिवाय उपयोग नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांना मानणाऱ्या घटकाने निवडणूक प्रक्रिया जाहीर होताच निवडणूक अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे. तसेच, दाखल केलेले अर्ज 4 नोव्हेंबरपर्यंत परतही घेता येणार आहेत.
राज्यात आगोदरच युती आणि आघाड्यांचे राजकारण सुरु आहे. त्यातही राज्यातील राजकीय पक्षांची अवस्था छिन्नविच्छीन्न झाली आहे. अशा वेळी जरांगे यांच्यासारखा सामान्य व्यक्ती एखाद्या समाजाच्या नावावर संघटन उभा करतो, त्याला यश कसे मिळते याबाबत सर्वच स्तरातून उत्सुकता आहे.