महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांची तयारी प्रचाराच्या दृष्टीने सुरू झाली आहे. अशातच आता मनोज जरांगे यांनी आता विधानसभा निवडणूक थेट लढण्याचा मानस व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी किंवा महायुतीला मदत किंवा पाडापाडी पुरता मर्यादित न राहता संमिश्र ताकद लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या पुरता त्यांनी इच्छुकांना फॉर्म भरण्याच्या सूचना केल्या आहेत. 29 ऑक्टोबर ही फॉर्म मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तोपर्यंत काही समीकरणं जुळणार का? याची माहिती घेतली जाणार आहे आणि त्यानंतर अंतिम फॉर्म्युला सांगितला जाणार आहे.
मनोज जरांगे यांचा संमिश्र लढ्याचा प्लॅन काय?
मनोज जरांगे यांनी तूर्तास सार्या इच्छूकांना फॉर्म भरण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र निवडून येण्याची क्षमता असलेल्या ठिकाणीच फॉर्म भरले जाणार आहेत. यामध्ये एससी आणि एसटी जागा सोडून फॉर्म भरण्याच्या सूचना आहेत.
29 ऑक्टोबर पर्यंत मनोज जरांगे काही समीकरणं जुळवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. 29 ऑक्टोबर नंतर ज्यांना फॉर्म मागे घेण्यास सांगितले जातील त्यांनी कोणतेही आडेवेढे न घेता ते मागे घ्यायचे आहेत.
जेथे उमेदवार दिले जाणार नाहीत तेथे मराठा आरक्षणाला समर्थन देणार्याला त्यांचा पाठिंबा मिळेल पण उमेदवाराकडून त्यांची ही भूमिका 500 रूपयांच्या बॉन्ड पेपर वर लिहून घेतली जाणार आहे.
मनोज जरांगे यांनी आपला संघर्ष राजकारणासाठी नाही तर समाजासाठी आहे असं म्हटलं आहे. मराठा आरक्षणाचा फटका लोकसभा निवडणूकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बसला होता. त्यामुळे आता विधानसभेसाठी त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.