
औरंगाबाद: कानाला हेडफोन (Headphone) लावून रेल्वे रुळावर आपल्याच तंद्रीत मार्गक्रमण करणे एका गुराखी तरुणाच्या जीवावर बेतले आहे. कानाला हेडफोन लावून रेल्वे रुळावर असलेल्या या तरुणाला पाठीमागून आलेल्या रेल्वेचा धक्का बसला. या घटनेत या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेख नाबीद शेख नूर पाशा (वय २२, रा. राजनगर, मयूरबन कॉलनी, जि. औरंगाबाद) असे या घटनेत मृत्यू झालेल्या गुराखी तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, शेख नाबीद हा पशूपालन (Animal Husbandry) व्यवसाय करायचा. राजनगर भागात त्याच्या जनावरांचा गोठा आहे. शेख नाबीद हा रविवारी (7 जुलै 2019) म्हशी चारण्यासाठी रानात घेऊन गेला होता. या रानातून रेल्वेमार्ग जातो. रानात म्हशी चारत होत्या. शेख नाबीद कानात हेडफोन घालून रेल्वे रुळावर होता. दरम्यान, पाठीमागून रेल्वे आली. रेल्वेने नेहमीप्रमाणे हॉर्न वाजवला. पण, कानाला हेडफोन लावलेल्या नाबीद याच्यापर्यंत हा आवाज बहुदा पोहोचलाच नाही.
पाठीमागून वेगाने आलेल्या रेल्वेची नाबीद शेख याला धडक बसली. धडक इतकी जबरदस्त होती की, त्याच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि छातीला मार लागला. या घटनेनंत नाबीद याचा मित्र योगेश वाघमारे हा त्याला रुग्णालयात तातडीने घेऊन गेला. परंतु, उपचार सुरु असतानाच नाबीद याचा मृत्यू झाला. (हेही वाचा,रेल्वे रुळांवर बसून PUBG गेम खेळणे जीवावर बेतले, रेल्वेच्या धडकेने दोन तरुणांचा जागीच मृत्यू )
दरम्यान, जवाहरनगर पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून, अकस्मात मृत्यू अशी पोलीस दप्तरी नोंद केली आहे. पुढील तपास सुरु आहे.