Tiger Attack In Gadchiroli: गडचिरोलीच्या (Gadchiroli) वडसा जंगलात (Wadsa Forest) धक्कादायक घटना घडली आहे. गुराढोरांना चरायला घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीवर वाघाने अचानक हल्ला (Tiger Attack) केला आहे. वाघाच्या या हल्ल्यात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. यामुळे गावकऱ्यांना एकट्याने जंगलात जाऊ नये, असे आवाहन वन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात वाघाची दहशत पसरली आहे. यामुळे गावकरी घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, दंबाजी डोंगरे (वय, 55) असे वाघ हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दंबाजी हे चर्चुरा गावातील रहिवाशी होते. दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी ते आपल्या गुराढोरांना चरायला घेऊन जात होते. त्यावेळी अचानक समोर आलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. ज्यामुळे गंभीर जखमी झालेले दंबाजी यांचा मृत्यू झाला आहे. दंबाजी यांचा मृतदेह वडसा येथील पोर्लाच्या कंपार्टमेन्ट क्रमांक 54 मध्ये आढळला. याबाबत उपवनसंरक्षक धरमवीर साल्विठ्ठल यांनी माहिती दिली आहे. हे देखील वाचा-पनवेल: सोने चोरीसाठी 60 वर्षीय व्यक्तीची गळा आवळून हत्या; 2 जण अटकेत
गडचिरोलीत याआधी मे महिन्यात रानभाज्या तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या 40 वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला केला होता. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे दिभना परिसरात वाघाची दहशत पसरली होती. तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याने वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशा मागणींनी जोर धरला होता.