पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; 60 गाड्या अंगावरुन गेल्याने छिन्न विछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

पुणे मुंबई एक्स्प्रेस वे (Pune Mumbai Expressway) वर झालेल्या भीषण अपघातात 47 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कामशेट जवळील बाऊर गावात बुधवारी (19 फेब्रुवारी) रात्री 8 च्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर बराच वेळ मृतदेह रस्त्यावरच होता. त्यावरुन जवळपास 60 गाड्या गेल्या. या दुर्दैवी घटनेनंतर मृतदेहाचे अक्षरशः तुकडे मिळाले, अशी माहिती कामशेट पोलिसांनी दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या घटनेची माहिती मिळताच पोलसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक थांबवून छिन्न विछिन्न झालेल्या मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेण्यात आले. (चंद्रपूर: भाविकांच्या वाहनाला अपघात, 6 ठार, 6 जखमी; मूल तालुक्यातील केसलाघाट येथील घटना)

मृत व्यक्तीच्या शर्टाच्या खिशातून मिळालेल्या कागदपत्रावरुन त्याची ओळख पटली आहे. अशोक मगर असे या मृत व्यक्तीचे नाव असून तो बाऊर गावातील येथील रहिवासी होता. प्रथम कोणत्या वाहनाची धडक या व्यक्तीला लागली, हे अद्याप कळू शकलेले नाही. परंतु, मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाने मगर यांना प्रथम धडक मारली असेल, असा अंदाज आहे. (तामिळनाडू: बस-ट्रकच्या भीषण अपघातात 19 जणांचा मृत्यू, 15 गंभीर जखमी)

पुणे एक्स्प्रेस वे वरील कॉरीडोर ओलांडत असताना मगर यांना वाहनाची धडक लागली. एक्स्प्रेस वे वरील कॉरीडोर ओलांडण्यास बंदी असून पादचाऱ्यांसाठी ब्रिज आहे. मात्र मगर यांच्या एका चुकीमुळे त्यांचा असा दुर्दैवी अंत झाला. अपघातानंतर 150 मीटर पर्यंत रक्त पसरले होते. तसंच रात्रीच्या अंधारात भरधाव वेगात असणाऱ्या गाड्या यामुळे रस्त्यावरील मृतदेहाकडे कोणाचेही लक्ष गेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.