विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर महायुती (Mahayuti) फुटणार की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) तिसऱ्या आघाडीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु असतानाच आरोग्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलेल्या विधानामुळे या चर्चेस बळकटी मिळाल्याचे बोलले जात आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सांवत यांनी मित्रपक्षावर सडकून टीका केली. सुरुवातीपासूनच आपणास राष्ट्रवादीची अॅलर्जी आहे. त्यामुळे आज जरी आपण त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत असलो तरी, बाहेर आल्यावर आपल्याला उलट्या होतात, असे सावंत यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही तीव्र प्रतिक्रिया आली आहे. महायुतीतून बाहेर पडलेलेच चांगले, असे मत राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.
महायुतीपुढे जागावाटपाचे त्रांगडे
महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्याखालोखाल शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी क्रमवारी आहे. दरम्यान, विधानसभेच्या एकूण 288 पैकी कोणी किती जागा लढवायच्या यावरुन घटक पक्षांमध्ये स्पर्धा आहे. दरम्यानच, अजित पवार यांची महायुतीमध्ये एन्ट्री झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची बार्गेनिंग पॉवर तुलनेत कमी झाली आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच अजित पवार यांना शिवसेनेकडून विरोध आहे. दुसऱ्या बाजूला भाजपच्या शिर्ष नेत्यांनी राष्ट्रवदी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचारावरुन तीव्र टीका केली होती. त्याच पक्षासोबत सत्ता स्थापन केल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्येही तीव्र नाराजी आहे. अशा वेळी अजित पवार यांची महायुतीमध्ये कोंडी तर केली जात नाही ना? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. (हेही वाचा, CM Eknath Shinde शिंदे यांच्या शिवसेनेत वाद, ठिणगी पडली, घ्या जाणून)
तानाजी सावंत काय म्हणाले?
एका जाहीर कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांनी म्हटले की, आपण सुरुवातीपासूनच हाडामासाचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आपले आणि काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाशी आपले जमत नाही. आपल्याला त्यांची अॅलर्जी आहे. आज जरी आपण त्यांच्या मांडीला मांडील लावून बसत असलो तरी, बाहेर आलो की, उलट्या होतात. सावंत यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, Devendra Fadnavis उद्विग्न, म्हणाले 'पक्षाने सांगितले तर चपरासी होईन')
राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया
तानाजी सावंत यांचे वक्तव्य येताच त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. आम्हाला तानाजी सावंत यांच्याकडून काही ऐकण्याची गरज नाही. महायुतीमध्ये राष्ट्रवादीबद्दल अशी वक्तव्य होत असतील, आणि मित्रपक्षांची ही भावना असेल तर आपण महायुतीतून बाहेर पडलेले बरे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या सर्व प्रकारावर उपमुख्यंत्री अजित पवार यांनी भूमिका काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या एका फाईलवर सही करण्यास अजित पवार यांनी नकार दिला होता. त्यातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात काही वादविवाद झाल्याच्याही बातम्या आल्या होत्या. त्यामुळे या वादाचीही किनार सावंत यांच्या वक्तव्याला असावी, असा राजकीय वर्तुळातून कयास लावला जात आहे.