Nanded APMC

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीची (Nanded Agricultural Produce Market Committee) एकहाती सत्ता प्राप्त करत भाजप (BJP) आणि शिंदे गटाचा (Shinde Group) सुफडा साफ केला आहे. 18 पैकी 17 जागा या ठिकाणी  महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. या निवडणुकीत  काँग्रेसला (Congress) 12, राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) 3, ठाकरे गटाला 2 जागा तर एक जागा अपक्षाला मिळाली आहे. तर भाजप आणि शिंदे गटाला एकही जागा मिळाली नाही. या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी गड राखला आहे. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले होते. या निवडणुकीत राजकीय नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. अखेर या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला पराभवाचा धक्का बसला आहे.नांदेडमध्ये झालेल्या पाच बाजार समितीच्या निवडणुकीत काँगेसला यश मिळालं आहे.

नांदेडमध्ये आम्हाला लोकांची काँग्रेसला साथ आहे. लोकांचं प्रेम आहे, त्यांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळं नांदेड जिल्ह्यात काँगेस आणि महाविकास आघाडीला यश मिळालं असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली. राज्यात मधल्या काळात जी राजकीय उलधापालथ झाली, ती अनैसर्गिक होती. कायद्याला धरुन नव्हती असंही चव्हाण म्हणाले. मात्र, लोकांना ते आवडलं नाही. त्यामुळं बाजार समिती निवडणुकीत राज्यात भाजपचा पराभव झाल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.