भाजप नेत्यांसह राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा वारंवार झालेला अपमान त्याचप्रमाणे कर्नाटक सीमावादाचा सुरु असलेला प्रश्न या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने एल्गार पुकारला आहे. या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने आज मुंबईत महामोर्चा काढला आहे. दक्षिण मुंबईतील भायखळा रिर्चड्सन क्रुडासपासून या मोर्चाला सुरुवात झाली असुन हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. तरी महाविकास आघाडीच्या या मोर्चात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे विविध महत्वाचे नेते उपस्थित झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महतावाचे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विशेष उपस्थिती दर्शवत विद्यमान सरकारबाबत आपल्या खोचक प्रतिक्रीया नोंदवल्या आहेत.

 

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ सावित्रीबाई फुले आणि इतर महान व्यक्तींच्या विरोधात काहीही बोलल्यास महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही. शिंदे सरकारला आमचा संदेश आहे की त्यांनी राज्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये, असे खडे बोल माजी राज्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्य सरकारला सुनावले आहेत. तर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले काही मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून काढून गुजरातला नेले आणि गुजरात विधासभा निवडणुका भाजपने जिंकल्या. पण महाराष्ट्रातील जनता हे विसरणार नाही राज्यातील निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र आपल्या मतांमधून योग्य तो संदेस देईल. (हे ही वाचा:- Rashmi Thackeray in MVA Mumbai Morcha: रश्मी ठाकरे मविआच्या महाविराट मोर्चात सहभागी, शिवसैनिकांमध्ये उत्साह)

 

तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. आजच्या मोर्चात प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी सामील झाला असल्याचे संजय राऊत म्हणाले. आपल्या महापुरुषांचा अपमान सहन करणारे मंत्रालयात बसले आहेत हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा अपमान आहे. महाराष्ट्राची साडेअकरा कोटी जनता हे सरकार उलथून टाकण्याच्या संधीची वाट पाहत आहे. आजचा मोर्चा म्हणजे हे सरकार उलथून टाकण्यासाठी टाकलेलं हे पहिलं पाऊल असल्याचे सांगत राऊत यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.